मीनाक्षी जगदाळे
अंजली जेव्हा समुपदेशनसाठी आली तेव्हा तिचं म्हणणं होतं की मी काय निर्णय घेऊ मला काहीच कळत नाहीये. इतके वर्षं एकत्र राहताना अनेकदा मला विजयबाबतीत संशय होता की, तो इतर महिलांच्या पण संपर्कात आहे. तो एकावेळी अनेक महिलांना खेळवतो आणि वेड्यात काढतो आहे. पण तो माझ्याशी ज्या पद्धतीने वागायचा, माझ्यासाठी घरच्यांशीसुद्धा वाद घालायचा, त्यांनासुद्धा झुगारून द्यायचा, मला वाटायचं तो खरंच फक्त माझा आहे. तो मला वेळोवेळी हेच सांगायचा की, मी केवळ त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्या घरातील लोक, आजूबाजूचे लोक त्याला मला तोडण्यासाठी कट-कारस्थान करतात. पण मी दुर्लक्ष केलं पाहिजे. अंजलीचं म्हणणं होतं विजयच्या घरातील लोक तिच्यासाठी खूप खालच्या दर्जाचे शब्द वापरतात. पण विजयच्या प्रेमाखातर ती सगळं सहन करते आहे. तिला अनेकदा अनेक जणांनी विजयच्या सवयीबद्दल प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या समजावण्याचा प्रयत्न देखील केलेला होता. जेव्हा जेव्हा तिने विजयकडे यावर स्पष्टीकरण मागितले होते तेव्हा त्याने हेच सांगितलं होतं की, आपल्या नात्यावर लोक जळतात, लोकांना आपलं चांगलं चाललेलं पाहावत नाही, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला कधीही अंतर देणार नाही.
आता अंजलीची मुख्य समस्या ही होती की, तिला काही महिन्यांपूर्वी विजयच्या मोबाइलमध्ये अनेक महिलांचे नको त्या अवस्थेतील फोटो, व्हीडिओ आणि खालच्या दर्जाची चॅटिंग मेसेज सापडले होते. त्यातील अनेक महिलांना तर खुद्द अंजली बऱ्यापैकी ओळखत होती. कोणी त्याच्या व्यावसायिक कामातील होत्या, कोणी ऑफिसमधील होत्या, कोणी नात्यातील देखील होत्या, तर कोणी तो जिथे नेहमी खरेदीला जातो त्या दुकानदार होत्या, तर कोणी इतर शहरातीलसुद्धा त्याच्या संपर्कात होत्या. हे सर्व पाहून अंजलीला धक्का बसला होता आणि ज्याच्या मागे दहा वर्षं घालवली त्याने आपल्यासोबत काय केलं? न लग्न केलं, न आपल्या नात्याला न्याय दिला, न समाजात किंवा त्याच्या घरात मला आदर मिळाला ! विजयला याबद्दल विचारणा केली असता त्याने परत तिला भावनिक करून, तात्पुरती माफी मागून सावरा सावर करून अंजलीचं मनपरिवर्तन केलं होतं आणि अंजलीचं मन अजूनही सत्य परिस्थिती स्वीकारायला तयार नव्हतं.
समाजात अशा अनेक महिला आहेत ज्या एखाद्या पुरुषाची बायको त्याच्यासोबत राहत नाही, नांदत नाही किंवा लांब आहे म्हणून राजरोस त्याच्या घरात येऊन राहतात किंवा तो जिथे सोय करेल, ठेवेल तिथेच राहायला लागतात. बायको शरीराने लांब आहे, नवऱ्यासोबत नाही याचा अर्थ अनेक महिला असा घेतात की, यांचा घटस्फोट झाला आहे किंवा लवकरच होणार आहे किंवा झाला काय नाही, झाला काय आम्ही नवरा-बायकोसारखेच एकत्र राहत आहोत. आम्हाला कायदेशीर लग्नाची गरज नाही. आमची मनं जुळली आहेत, आमचं प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. प्रेमाला कसलेही बंधन नसतं इत्यादी भ्रामक कल्पना स्वतःचीच फसवणूक करण्यासाठी महिला वापरत असतात.
अशा महिलांना वारंवार हेच सांगावेसे वाटते की, नवरा-बायकोसारखं राहणं आणि कायदेशीर नवरा- बायको असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बायांनो सत्य स्वीकारा! लग्न झालेल्या, विवाहित पुरुषाच्या आयुष्यात, घरात पाय ठेवताना हजार वेळा विचार करा, कोणासाठी ठेवलेली म्हणून राहू नका, स्वतःचं अस्तित्व जपा, स्वतःची पायरी ओळखा, आपला मान-सन्मान आंधळ्या प्रेमासाठी उधळून देऊ नका. वर्षानुवर्षे एखाद्याच्या आयुष्यात असे बेकायदेशीर नाते स्वीकारून राहणे यातून काहीही निष्पन्न होत नाही. त्यातून अंजलीसारखं राहणं! विजयचे अनेक बायकांशी संबंध असल्याचे कळल्यावर तिची झालेली दुर्दशा आणि त्याच्या घरातील सर्वांनी तिची कायम केलेली हेटाळणी आणि तिरस्कार यातून तिने दहा वर्षांत काय मिळवलं? विजयने तिच्यावर मारेमाप पैसा खर्च केला होता, तिला तिच्या मुलांना हिंडवणे फिरवणे, विविध वस्तू खरेदी करून देणे, अंजलीला शारीरिक सुख देणे, तिला स्वतःच्या घरात ठेऊन घेणे हे सर्व जरी तत्कालिक स्वरूपात सुखावणारे असले, छान वाटणारे असले तरी यातून अंजलीचं झालेलं मानसिक, सामाजिक नुकसान भरून येण्यासारखं नक्कीच नाही. अंजली स्वतः आर्थिक दृष्टीने उत्तम होती, स्वतःच्या पायावर उभी होती, तिला स्वतःचं घरदार होतं तरीही एखाद्या परपुरुषाच्या घरात राहून, तिला त्याची ठेवलेली, रखेली यापलीकडे कोणतेही नाव, कोणतीही ओळख विजयने दिलेली नव्हती.
अशा वेळी महिलांनी हा विचार करणे आवश्यक आहे की, या माणसाच्या आयुष्यात माझं स्थान काय आणि आमच्या नात्याला नाव काय? प्रेम म्हटले तरी विवाहित पुरुषाने अथवा स्त्रीने लग्नानंतर केलेले प्रेम हे जगासाठी व्यभिचार असतो. त्यातून ते किती खरं, किती खोटं, किती काळ टिकणारं? किती प्रामाणिक? किती जणींशी? किती जणांशी? जो माणूस स्वतःच्या पत्नीला, मुलाला वाऱ्यावर सोडू शकतो, जो माणूस घरच्यांना पैसा फेकून स्वतःच्या तालावर नाचवतो तो पूर्णपणे आपला होऊ शकेल का? हा सारासार विचार अंजलीने करणे आवश्यक होते. विजय तिला विविध वचने देत गेला. कायम तिला भावनिक करून गुंडाळत गेला. तिला, तिच्या मुलांना हवं ते पुरवून अंजलीचं तोंड गप्प करीत राहिला. समाजात, नातेवाइकांत विजयची खरी बायको-मुलं कोण आहेत हे माहिती असताना देखील, अंजलीला बरं वाटावं, तिचं मन जिंकावं म्हणून चारचौघात अंजलीला बायको सांगून फिरवत राहिला आणि यालाच भारावून जाऊन अंजलीने स्वतःच्या आयुष्यातील इतकी वर्षे व्यर्थ घालवली.
हेच अंजलीने स्वतःच्या पतीच्या निधनानंतर तरुणपणीच रितसर दुसरा विवाह केला असता, राजरोस कायदेशीर लग्न करून थोडीफार तडजोड स्वीकारून एखाद्याची बायको बनली असती, तर नक्कीच आज तिला समाजात, तिच्या नातेवाइकांत, माहेरी, सासरी सगळीकडे सन्मान मिळाला असता. तिच्या मुलांना दुसरा का होईना हक्काचा बाप मिळाला असता. महिलांनो आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल, साथ देईल अशी समाजमान्य, कायद्याने पाठबळ दिलेलीच संगत निवडा. उगाच प्रेमाच्या खोट्या कल्पनांना बळी पडून विवाहित पुरुषांचा संसार मोडायला कारणीभूत होऊ नका आणि स्वतःच्या आयुष्याचे देखील अवमूल्यन करून घेऊ नका.
(समाप्त)