मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात असलेला अनुभवी यष्टिरक्षक, फलंदाज दिनेश कार्तिक हा आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघात फिनिशरची भूमिका बजावू शकतो, असे मत विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपद्वारे भारताच्या संघात पुनरागमन करण्याचे त्याने बोलून दाखवले आहे.
त्याचा सध्याचा फॉर्म आणि निर्धार पाहता निवडसमितीने त्याचे वय विचारात घेऊ नये. सध्याची त्याची खेळी पाहावी. फॉर्म आणि फिटनेस पाहावा. कार्तिकची दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची ३४ चेंडूंतील नाबाद ६६ धावांची खेळी अप्रतिम होती. त्याने कमालीचे सातत्य राखले आहे. फॉर्म कायम ठेवला, तर सहाव्या आणि सातव्या क्रमांकासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो, असे समालोचक गावस्कर यांनी म्हटले आहे.
आयसीसी २०२२ टी-ट्वेन्टी वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यंदाच्या हंगामात बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचे प्रतिनिधित्व करताना दिनेशने पाच डावांत ३२, १४, ४४, ७, ३४ आणि ६६ धावा फटकावल्यात.