अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारत दरवर्षी ८.५ लाख कोटी रुपयांच्या दुधाचे उत्पादन करतो. दुधातून होणारी उलाढाल ही गहू आणि तांदळापेक्षा जास्त आहे. तसेच लहान शेतकरी दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठे लाभार्थी आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज त्यांनी बनास कांठामधील दियोदर येथे नवीन डेअरी कॉम्प्लेक्स आणि बटाटा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
आज भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांची उपजीविका दुधावर अवलंबून असताना, भारत वर्षाला ८.५ लाख कोटी रुपयांचे दूध उत्पादन करतो. पण याकडे बड्या अर्थतज्ज्ञांसह देशातील अनेक लोकांचे दुर्लक्ष होतेय. खेड्यांमधील विकेंद्रित अर्थव्यवस्था याचे उदाहरण आहे. गहू आणि तांदळामधून होणारी उलाढाल देखील दुधाच्या उत्पादनइतकी नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम बनविणे हाच नवीन डेअरी कॉम्प्लेक्स आणि बनास डेअरीच्या बटाटा प्रक्रिया प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच या प्रकल्पाद्वारे या प्रदेशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येईल, असेही पंतप्रधान म्हणाले. तसेच चीज उत्पानद प्रकल्प, दामा येथील सेंद्रीय खत प्रकल्प हे सर्व देशाला समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.