शहापूर (वार्ताहर) : शहापूर तालुक्यात मध्य रेल्वेचे वासिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, खर्डी, उंबरमाळी व कसारा हे ७ रेल्वे स्थानक असून परिसरातील रहिवाशांना वाहतुकीसाठी असलेले भुयारी मार्ग हे गैरसोयीचे ठरत आहेत़ अरूंद व पाणी जाण्यासाठी केलेले हे सर्वच अरुंद भुयारीमार्ग पावसाळ्यात नागरीकांची डोकेदुखी ठरत आहेत. पावसाळ्यात या भुयारी मार्गातून वाट काढताना वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे. इतकेच नव्हे तर या गैरसोयीच्या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या सर्व स्थानक व परिसरात पर्यायी उड्डाण पुल वा अंडरपासची सुविधा अद्यावत करून मिळावी अशी मागणी तालुक्यातील रहिवाशांकडून होत आहे.
मध्य रेल्वेच्या वासिंद रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागात भातसई, शेरे, शेई, बावघर, मासवणे, अंबर्जे, मढ हाल कोसले, गेरसे, काकडपाडा, पळसोळी यासह जवळजवळ ३५ गाव व पाडे आहेत. या भागात एसटी बस, मालवाहू ट्रक, जिप, रिक्षा ही वाहने जाण्यासाठी वासिंद स्टेशनजवळ एक अंडरपास आहे. दरवर्षी पावसाळयात या पुलाखाली दिवसांतून चार ते पाच तास सतत ३ ते ४ फूट पाणी साचत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. परिणामी वासिंद पूर्व भागातील या संपूर्ण गावांचे दळणवळण बंद होऊन विद्यार्थी, रुग्ण, नागरीक यांची कोंडी होत असते. मात्र या ठिकाणी आता नव्याने उड्डाणपुलाचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याने यातून लवकरच मुक्तता होईल अशी अपेक्षा वासिंद परिसरातील ४२ गावांतील नागरीकांकडून व्यक्त होत आहे.
तर आसनगाव येथे पूर्वीचे रेल्वे फाटक बंद केल्याने आसनगावकरांना कोणत्याही वाहनाने शहापूर येथे जाण्यासाठी किमान ३ ते ४ किमीचा फेरा घालावा लागतो. इतकेच काय पण या मार्गाने सध्या कोणतेही खासगी वाहन शहापूर येथे भाड्याने जाण्यास तयार नाहीत. आसनगावची लोकसंख्या आता १५ हजारांपर्यंत पोहोचली असून या परिसरात मोठ्या प्रमाणात लघुउद्योगाचे जाळे आहे. त्यामुळे नागरीकांची प्रचंड गैरसोय होत असल्याची तक्रार आसनगावचे माजी सरपंच संजय भांगरे यांनी केली आहे.
शहापूर तालुक्यातील कळमगाव ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती असून परिसरात आदिवासी पाड व शेतकरी वर्ग राहत आहे. या ठिकाणी महामार्ग जात असल्याने परिसरात विकासाची संधी निर्माण झाली आहे. मात्र रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गामुळे वाहतूक सुरळीत होत नसल्याने विकासात अडथळा निर्माण झाला आहे. हा प्रश्न रेल्वे प्रशासन तसेच राज्य शासनाने संयुक्तरीत्या प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
– विठ्ठल भोईर, सामाजिक कार्यकर्ते, कळमगाव