
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात अन्य राज्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आणि पॉझिटिव्ह रेटमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेसह पंचसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढ झपाट्याने पाहायला मिळत आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र पाठवले आहे. नोएडा, एनसीआर आणि चंदीगड या भागांचाही समावेश आहे. ज्यामध्ये सतत वाढणाऱ्या कोरोना सकारात्मकतेच्या दराचा उल्लेख करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने याबाबत आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
राज्यातील आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मंगळवारी १२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ७८,७६,०४१ इतकी झाली आहे. दरम्यान, तीन दिवसांनंतर राज्यात कोरोनामुळे मंगळवारी तीन रुग्ण दगावले आहेत.
त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या १,४७,८३० इतकी झाली आहे. त्याआधी सोमवारी (१८ एप्रिल) रोजी राज्यात ५९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर १६ एप्रिलला ९८ आणि १७ एप्रिलला १२७ नव्या रुग्णांचे निदान झाले होतं. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १०८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
मुंबई मंगळवारी ८५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी ३४ रुग्ण वाढले होते. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे मुंबईत एकाही रुग्णाचा बळी गेला नव्हता.