सुकृत खांडेकर
मशिदींवरील भोंगे हटविले जाणार नसतील, तर ईदनंतर मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आणि राज्यातील वातावरण ढवळून निघाले. हनुमान जयंतीला यंदा आरती, महाआरती, हनुमान चालिसा, शोभा यात्रा यांची सर्वत्र रेलचेल दिसली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला राज यांच्या भाषणाने रस्त्यावर उभे करून आरती म्हणायला लावली. यापूर्वी राजकीय पक्ष आपले झेंडे लावून कधी हनुमान जयंती साजरी करताना कुठे दिसत नव्हते, ते काम राज यांच्या हनुमान चालिसाच्या घोषणेने केले.
गुढीपाडव्याला मनसेची मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर विराट सभा झाली. १२ एप्रिल रोजी ठाण्यातील सभेला प्रचंड गर्दी लोटली. आता १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. शिवाजी पार्कवरील सभेत त्यांनी शिवसेना व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य बनवले होते, तर ठाण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाआघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना हल्ल्याचे टार्गेट केले. या दोन्ही सभांनंतर त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अंगावर घेतले. शरद पवारांवर निष्ठा दाखविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, मंत्री आणि उद्धव ठाकरेंवर निष्ठा प्रकट करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री, नेते यांची राज ठाकरेंवर तुटून पडण्याची स्पर्धा सुरू झाली. राज ठाकरे यांना गांभीर्याने घेत नाही, असे सांगत शरद पवारांनीही त्यांच्यावरील केलेल्या टीकेचे सविस्तर खुलासे केले. राज ठाकरे यांची मनसे म्हणजे भाजपची ‘सी’ टीम आहे, अशी खुलेआम टीका शिवसेनेने केली, तर राज यांच्या भाषणाचे स्क्रिप्ट भाजपने लिहून दिले होते, असेही महाआघाडीने म्हटले.
देशात ‘समान नागरी कायदा’ लागू करावा आणि प्रचंड वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणारा कायदा आणावा, अशी विनंती राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर सभेतून केली. देशाच्या दृष्टीने हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण मशिदींवरील भोंगे हटवा हा मुद्दा संवेदनशील आहेच. पण स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना जिव्हाळ्याचा आहे. आपण मुस्लिमांच्या विरोधात नाही आणि हिंदूंनाही दूर ठेवत नाही, अशी दाखविण्याची कसरत राजकीय पक्षांना करावी लागत आहे. राज यांच्या सभेतील भाषणाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्याबरोबर फरफटत चाललेल्या शिवसेनेला आरती म्हणण्यासाठी रस्त्यावर आणले. मशिदींवरील भोंग्यांसंबंधी जी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जाहीरपणे मांडत होते, तीच भूमिका आज राज ठाकरे मांडत आहेत. तेव्हाही हे भोंगे बंद झाले नाहीत, नजीकच्या काळात ते बंद होण्याची शक्यता नाही. मशिदींवरील भोंग्यांसाठी ज्यांनी परवानगी घेतली आहे त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगून त्यांना अभय दिले आहे. मशिदींवरील भोंगे यांचा ईस्लाम धर्माशी काही संबंध आहे का? अन्य देशांत असे कुठेही भोंगे नाहीत. मुंबई व महाराष्ट्रात किती मशिदी आहेत, त्यावर किती भोंगे आहेत. दिवसातून ते किती वेळा चालू असतात, त्याची तीव्रता किती असते याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे. मशिदींवरील भोंग्यांना कधीपासून परवाने देणे सुरू झाले हे सुद्धा जाहीर करावे, किती ठिकाणी असे परवाने आहेत व किती ठिकाणी अनधिकृत भोंगे आहेत व त्यावर आजवर काय कारवाई केली, हेही सरकारने जनतेपुढे मांडावे. गोकुळाष्टमीला किती उंचीवर दहीहंडी बांधावी, यासाठी सरकारने नियम केले आहेत. दिवाळीला फटाके कसे वाजवावेत, यावरही निर्बंध असतात. तसे मशिदीवरील भोंग्यांसंबंधी काय नियम आहेत, हे एकदा ठाकरे सरकारने जाहीर करावेत.
कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये मुंबईतील बहुसंख्य अल्पसंख्य वस्तीत व मोहल्ल्यांमध्ये कोणतेच नियम पाळले जात नसत. तेथे लोक मास्क लावत नसत. रस्त्यावर गर्दी असे. पण पोलीस कधी तिकडे फिरकतही नसत. सर्वसामान्य मुंबईकर रोज हतबलतेने हे सारे अनुभवत होते. त्यामुळेच मशिदीवरील भोंगे उतरण्याची शक्यता कमीच आहे. नमाजाला विरोध नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणत व राज ठाकरेही तेच म्हणत आहेत. भोंग्यांवरील मोठ्या आवाजाला विरोध, ही त्यांची भूमिका आहे. भोंगे लावण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन होत नाही हे वास्तव आहे. रेल्वे स्थानकाच्या बाहेर ठरावीक अंतरापर्यंत फेरीवाले बसू शकणार नाहीत, यासंबंधी दिलेल्या आदेशाचेही पालन होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे राज्य सरकारच पालन करणार नसेल, तर सर्वसामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे? बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई करण्याऐवजी राज ठाकरे भाजपचे कसे एजंट आहेत व ते सामाजिक वातावरणात तेढ निर्माण करीत आहेत, असा हल्ला महाआघाडीने सुरू केला आहे.
राज ठाकरे यांनी कोणती विचारसरणी स्वीकारावी किंवा कोणत्या राजकीय पक्षांबरोबर युती करावी हा त्यांचा प्रश्न आहे. महाआघाडीतील सर्वच पक्षांनी आपले मित्र अनेकदा बदलले आहेत. राज हे परवा मोदींचे कौतुक करीत होते, काल त्यांच्याविरोधात होते व आज पुन्हा भाजपचा अजेंडा राबवत आहेत, म्हणून महाआघाडीतील घटक पक्ष अस्वस्थ झाले आहेत का?
राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट बोचरी टीका केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांचे पुस्तक या वादाला पुन्हा तोंड फुटले. शरद पवारांच्या खुलाशानंतर मनसेने पुरंदरे व ऑक्सफर्ड प्रेस यांच्यातील पत्रव्यवहार उघड करून पवार हे कसे जातीवादी राजकारण खेळतात, असा आरोप केलाय.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोळा वर्षे झाली. भाषणांना अफाट गर्दी खेचणारा नेता अशी राज यांची प्रतिमा आजही कायम आहे. सत्तेवर नसताना आणि प्रमुख विरोधी पक्ष नसतानाही त्यांच्या भाषणाचे सर्व वृत्तवाहिन्या थेट प्रक्षेपण करतात. कारण त्यांचा टीआरपी खूप मोठा आहे. एवढी गर्दी जमूनही व मोठा प्रेक्षकवर्ग लाभूनही या पक्षाला मते का मिळत नाहीत? विधानसभेत एकच आमदार हे काही पक्ष रुजल्याचे लक्षण नाही. केवळ अन्य नेत्यांच्या नकला करून व त्यांची खिल्ली उडवून मते मिळत नाहीत. हनुमान चालिसाने राज ठाकरे यांना देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. पण निवडणुकीत त्याचा किती लाभ होईल, हे कुणी सांगू शकत नाही. अंगावर भगवी शाल लपेटणारे राज ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेने निघाले आहेत. भाजपच्या ते जवळ येत आहेत. महाराष्ट्रात भाजप व मनसे सध्या तरी एकमेकांना सोयीचे वाटू लागले आहेत.