मुंबई : महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने पुन्हा एकदा ३० टक्के दरवाढ केल्यामुळे आता ग्राहकांची हजामत होणार आहे. त्यामुळे येत्या एक मे पासून सलून आणि ब्यूटी पार्लरमध्ये जाताना आता अधिकची रक्कम सोबत ठेवा.
देशात सध्या सर्वसामान्यांना महागाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहेत. खाद्य तेलापासून ते इंधन दरवाढीपर्यंत महागाईचा भडका उडालेला दिसत आहे. त्यातच आता या महागाईच्या झळा आता तीव्र होणार आहे. कारण येत्या एक मे पासून केस कापणे, दाढी करणे महाग होणार आहे. सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी ३० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरापासून ते देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कच्च्या मालाच्या दरासह इंधन दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. दररोज वाढत असलेल्या महागाईमुळे दरवाढ करण्याची मागणी सलून व्यावसायिकांकडून करण्यात येत होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही दरवाढ लागू करण्यात आली आहे. असोसिएशनचे ५२ हजार सलून व ब्यूटी पार्लर चालक सदस्य आहेत. अखेर सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांच्या ऑनलाइन बैठकीत ३० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दरवाढ १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनापासून लागू होणार आहे.
विविध प्रकारच्या वाढत्या महागाईमुळे दरवाढ करण्यात आली आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सलून अॅण्ड ब्युटी पार्लरसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याशिवाय इतर घटकांमध्येही दरवाढ झाली असल्याने कमी दरात ग्राहकांना सेवा पुरवणे व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनीदेखील दरवाढीला सहकार्य करावे असे आवाहन सलून अॅण्ड ब्यूटी पार्लर असोसिएशनने केले आहे.