वसंत भोईर
वाडा : ताडगोळा म्हटले की मस्तमधूर आणि रसदार, तसेच उन्हाळ्याची काहिली कमी करणारे थंडगार रानमेवा. सद्या तापवणाऱ्या उन्हाने या ताडगोळ्यांची मागणी वाढवली आहे. ग्रामीण भागातील अनेकांना या ताडगोळे विक्रीतून मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे.
ताडाच्या झाडावर चढण्यामध्ये सराईत असलेल्या तरुणांनी ताडगोळे विक्रीचा चांगला व्यवसाय सुरू केला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई या शहरी भागांतून या ताडगोळ्यांना चांगली मागणी येत आहे. उन्हाळ्यातील विविध आजारांवर हे ताडगोळे फायदेशीर ठरत आहेत.
पोटातील उष्णता कमी करण्यासाठी, उन्हाळ्यात होणाऱ्या लघवीचे आजार कमी करण्यासाठी, तहान शमवण्यासाठी असे अनेक फायदे या ताडगोळ्यांपासून होत असल्याचे आयुर्वेदचार्यांकडून सांगितले जात आहे. एका ताडगोळ्याची किंमत ५ रुपयांपासून ८ रुपयांपर्यंत असली तरी ग्राहक मोठ्या संख्येने ताडगोळे विकत घेताना दिसत आहेत. या ताडगोळ्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत ताडाच्या (माड) झाडाला येणाऱ्या फळामधून थंडगार ताडगोळे मिळतात. नारळाच्या आकाराचे असलेल्या एका फळामध्ये तीन ते चार ताडगोळे असतात. एका झाडावर दीडशे ते दोनशे ताडफळे मिळतात.
जीव धोक्यात घालून फळे काढावी लागतात
ताडाचे झाड हे ४० ते ५० फूट उंचीचे असल्याने जीव धोक्यात घालून ताडफळे काढावी लागतात. तसेच ही फळे टणक असल्याने धारदार कोयत्याने फळातून ताडगोळे बाहेर काढावे लागतात. त्यामुळे थंडगार ताडगोळ्यांसाठी शेतकऱ्याला मेहनतही खूप करावी लागते.