Friday, May 23, 2025

क्रीडा

दिल्लीची गाठ पंजाबशी

दिल्लीची गाठ पंजाबशी

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामातील ३२व्या सामन्यात बुधवारी (२० एप्रिल) सीसीआयच्या ब्रेबार्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सची गाठ पंजाब किंग्जशी पडेल. यंदाच्या हंगामातील कामगिरी संमिश्र असली तरी मागील लढतीतील पराभवानंतर दोन्ही संघ विजयी ट्रॅकवर परतण्यास उत्सुक आहेत.


पंजाबने सहापैकी तीन सामने जिंकताना सहा गुणांसह ताज्या गुणतालिकेत सातवे स्थान राखले आहे. त्यांना तितकेच पराभवही पाहावे लागलेत. पॉइंटस टेबलमध्ये दिल्ली संघ त्यांच्या खालोखाल आहे. कॅपिटल्सना पाच सामन्यांत दोन विजय (४ गुण) मिळवता आले. तीनदा त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. मयंक अगरवालच्या नेतृत्वाखालील पंजाबचा मागील लढतीत सनरायझर्स हैदराबादकडून पराभव झाला. रिषभ पंत आणि कंपनीला बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सकडून मात खावी लागली. त्यामुळे गुणतालिकेत वरच्या स्थानावर सरकण्यासाठी पंजाबसह दिल्लीला विजयाची आवश्यकता आहे.


पंजाबसाठी लियाम लिव्हिंगस्टोनसह (३ अर्धशतक) लेगस्पिनर राहुल चहर (९ विकेट) आणि वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाचा (७ विकेट) फॉर्म महत्त्वपूर्ण ठरला आहे. ऑडियन स्मिथची (६ विकेट) त्यांना चांगली साथ लाभली आहे. तरीही किंग्जमध्ये सर्व काही आलबेल नाही. फलंदाजीत कर्णधार मयंकला ५ सामन्यांत ९४ धावा जमवता आल्यात. मुंबईविरुद्ध दुखापत झाल्याने मागील सामन्यात हैदराबादविरुद्ध तो खेळू शकला नाही. लिव्हिंगस्टोननंतर अनुभवी ओपनर शिखर धवनने (२०५ धावा) थोडा प्रतिकार केला तरी त्याची बॅटिंग लौकिकाला साजेशी नाही. एम. शाहरुख खान, जॉनी बेअर्स्टो, अष्टपैलू स्मिथ, भानुका राजपक्ष यांना फलंदाजी अपेक्षित योगदान देता आलेले नाही. चहर, रबाडा आणि स्मिथमुळे बॉलिंग थोडी फार व्यवस्थित असली तरी अर्शदीप सिंग, वरुण अरोरा यांना अद्याप छाप पाडता आलेली नाही.


दिल्लीला फलंदाजीत आघाडीच्या फळीमध्ये डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ (प्रत्येकी २ अर्धशतके) तसेच लेगस्पिनर कुलदीप यादव (११ विकेट) आणि मध्यमगती खलील अहमद यांच्यामुळे (८ विकेट) कॅपिटल्सना विजय पाहायला मिळाले आहेत. त्यांची बॅटिंग अद्याप बहरलेली नाही. पाच सामन्यांनंतर केवळ वॉर्नर आणि शॉ यांना हाफसेंच्युरी मारता आल्यात. कर्णधार पंतसह मनदीप सिंग, सर्फराझ खान, ललित यादव या डोमेस्टिक प्लेअर्सनी निराशा केली आहे. गोलंदाजीत कुलदीपसह खलीलने थोडी छाप पाडली तरी मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर, फिरकीपटू अक्षर पटेल, रोवमन पॉवेल, मुस्तफिझुर रहमान यांना प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखता आलेले नाही.


आयपीएलचा यंदाचा हंगाम जवळपास निम्म्यावर आल्याने प्रत्येक संघाला विजय आवश्यक आहे. त्यामुळे पंजाबसह दिल्लीला खेळ उंचवावा लागेल. त्यात अधिक उजवी कामगिरी करणारा संघ जिंकेल.


वेळ : रा. ७.३० वा. ठिकाण : ब्रेबार्न स्टेडियम


सामना पुण्याऐवजी मुंबईत


मिचेल मार्शसह पाचजण कोरोनाग्रस्त


ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शसह फिजिओ पॅट्रिक फॅरहार्ट, डॉ. अभिजीत साळवी तसेच सपोर्ट स्टाफमधील आकाश माने, चेतन कुमार यांना कोरोनाची बाधा झाल्याने दिल्लीच्या कंपूमध्ये खळबळ माजली आहे. पुण्यात सामना असल्याने मुंबई ते पुणे असा बस प्रवास पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दिल्ली वि. पंजाब सामना मुंबईत हलवण्यात आला आहे. हा सामना क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल.

Comments
Add Comment