Friday, January 17, 2025
Homeक्रीडाबंगळूरुने रोखले लखनऊला

बंगळूरुने रोखले लखनऊला

डु प्लेसिसची ‘कॅप्टन्स इनिंग’ निर्णायक

नवी मुंबई (प्रतिनिधी) : एकतर्फी लढतीत लखनऊ सुपर जायंट्सवर १८ धावांनी मात करताना बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी आयपीएलमध्ये ‘डबल फिगर’ गाठताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. कर्णधार फाफ डु प्लेसिसची ९६ धावांची चमकदार खेळी त्यांच्या पाचव्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

डी. वाय. पाटील स्टेडियमवर मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचे १८२ आव्हान लखनऊला पेलवले नाही. त्यांची मजल २० षटकांत ८ बाद १६३ धावांपर्यंत गेली. सर्वच प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. सलामीवीर क्विंटन डी कॉक (३) स्वस्तात बाद झाला. मात्र, कर्णधार लोकेश राहुलने (२४ चेंडूंत ३० धावा) थोडा प्रतिकार केला तरी वनडाऊन मनीष पांडे (६) लवकर परतला. चौथ्या क्रमांकावरील कृणाल पंड्याने २८ चेंडूंत ४२ धावा फटकावल्या तरी त्यामुळे रनरेट फारसा कमी झाला नाही.

मधल्या फळीतील दीपक हुडा आणि आयुष बदोनी (प्रत्येकी १३ धावा) तसेच मार्कस स्टॉइनिसने (२४ धावा) दोन आकडी धावा केल्या तरी बंगळूरुला मोठा विजय मिळवण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत. बंगळूरुकडून वेगवान गोलंदाज जोश हॅझ्लेवुड (४ विकेट) सर्वात यशस्वी ठरला. लखनऊचा कर्णधार राहुलने टी-ट्वेन्टी प्रकारात ६ हजार धावा पूर्ण केल्या. २३ धावांवर पोहोचला तेव्हा त्याने हा टप्पा गाठला. राहुलने १७९ सामने खेळताना ही मजल मारली. त्यात ५ शतके आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १३२ धावा ही राहुलची सर्वाधिक वैयक्तिक खेळी आहे. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना बंगळूरुने २० षटकांत ६ बाद १८१ अशी मोठी धावसंख्या उभारली.

रॉयल चॅलेंजर्सनी मोठे आव्हान उभे केले तरी त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अनुज राऊतला (४) डावातील पाचव्या चेंडूवर मध्यमगती गोलंदाज दुशमंत चमीराने कर्णधार राहुलकरवी झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर त्याने माजी कर्णधार विराट कोहलीला आल्यापावली माघारी धाडले. २ बाद ७ अशा बिकट अवस्थेत कॅप्टन फाफ डु प्लेसिस संघाच्या मदतीला धावला. त्यालला प्रथमच सूर गवसला. मात्र, तो नव्हर्स नाइंटीजचा बळी ठरला. डु प्लेसिसने ६४ चेंडूंत ९६ धावा फटकावल्या. त्यात ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

बंगळूरुच्या कर्णधाराने केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही तर छोटेखानी भागीदाऱ्या करताना संघाला सावरले. ग्लेन मॅक्सवेलसह तिसऱ्या विकेटसाठी ३७ धावा जोडल्या. त्यानंतर पाचव्या विकेटसाठी शाहबाझ अहमदसह ४८ चेंडूंत ७० धावांची पार्टनरशीप केली. बंगळूरुच्या डावातील ही सर्वाधिक भागीदारी ठरली. मॅक्सवेलने २३ आणि शाहबाझ अहमदने २६ धावा केल्या तरी त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. डु प्लेसिसने कार्तिकसह सहाव्या विकेटसाठी २७ चेंडूंत ४९ धावा जोडल्या.

शतक हुकलेला चौथा फलंदाज

लखनऊविरुद्ध बंगळूरुचा कर्णधार डु प्लेसिसचे शतक चार धावांनी हुकले. यंदाच्या हंगामात सेंच्युरीला मुकलेला तो चौथा बॅटर ठरला. डु प्लेसिस आधी गुजरातचा शुबमन गिल (९६), चेन्नईचा शिवम दुबे (नाबाद ९५) आणि गुजरातच्या डेव्हिड मिलरला (नाबाद ९४) शतकापासून वंचित राहावे लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -