नवी मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२१-२२ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४७५ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६५ (अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण करून घेणे अनिवार्य आहे.
३० वर्षांपेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजवयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावे.
नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परीक्षक (स्ट्रक्चरल इंजिनीयर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडे सादर करावयाचा आहे.