मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांत राज्यातील २२ हजार ६२० एसटी कर्मचारी आता पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये एसटीचे ६९ हजार ०८२ कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी जवळपास पाच महिने संपात सहभाग झालेले कर्मचारी पुन्हा कामावर परतत असल्याने लालपरीची चाके पूर्वपदावर येण्याची शक्यता आहेत.
आधी कोरोनामुळे आणि नंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला मोठा आर्थिक भार सोसावा लागला आहे. एसटीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आता एसटी कर्मचारी पुन्हा कामावर येण्यास सुरुवात झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता कर्मचारी कामावर रुजू होण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, तर सोमवारी एकाच दिवशी १५ हजार १८५ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्यास सांगितले आहे. त्यानुसार कर्मचारी पुन्हा आता कामावर हजर होऊ लागले आहेत. यामुळे एसटीची चाके पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. कर्मचारी कामावर येत असल्यामुळे हळूहळू एसटीच्या फेऱ्या सुरळीत सुरु होतील, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.