
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एका २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिघई परिसरात १७ एप्रिल रोजी काही जणांनी या तरुणाला महिलेसमोर जमिनीवर नाक घासायला लावले होते. परंतु हा अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. सचिन सोपान तळेकर असे या तरुणाचे नाव आहे.
या तरुणाने एका महिलेबाबत चुकीचे वक्तव्य केल्याचा समज झाला. मात्र या गैरसमजातून चौघांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. त्याच वेळी या चौघांनी तरुणाला महिलेसमोर जमिनीवर नाक ही घासायला लावले. परंतु हा अपमान सहन न झाल्याने सचिन तळेकरने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबा मोठा धक्का बसला आहे.
आत्महत्येनंतर मारहाण करणाऱ्या चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यांची नावे देखील समोर आली आहेत. या प्रकरणी किरण रामदास कान्हूरकर, विजय दत्तात्रय तापकीर, अमोल बाळासाहेब तापकीर आणि अभिनव अर्जुन गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.