नागपूर : मशिदीवरील लाऊडस्पीकरचा वाद ऐरणीवर आला असतानाच भाजपशासित राज्यांमधल्या मशिदींवरील भोंगे आधी खाली उतरवावे असा टोला आविहीपचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी लगावला. ते नागपूर येथे बोलत होते.
याविषयी तोगडिया म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपा सरकार असतानाही मशिदीवरील भोंगे होतेच. परंतु तेव्हा ते काढण्यात आले नाही. रात्री दहा ते सकाळी सूर्योदयापर्यत भोंगे वाजवण्यात येऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यातील जिल्हाधिकारी तसेच पोलिसांना तसे आदेश द्यावे, असे तोगडीया यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावे, अशी मागणी आम्ही दहा वर्षांपूर्वीच केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.
हिंदूत्व सोडल्याची टीका शिवसेनेवर केली जाते. पण, भाजपाला स्वत: काय केले याची आठवण नाही. रामसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुलायमसिंग यांच्यासोबत तसेच मेहबूबा मुफ्तीसोबत काश्मीरात भाजपाने सत्ता स्थापन केली, तेव्हा त्यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप कोणी केला नाही. मग शिवसेनेवर आरोप करण्याचे कारण नाही. भाजपाजवळ स्वत:ची पापे धुवून काढण्याची वाशिंग मशिन आहे काय? असा सवाल तोगडीयांनी केला.