
मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपकडून आजपासून पोलखोल अभियान सुरू केले जात असतानाच भाजपच्या पोलखोल रथाची अज्ञातांनी तोडफोड केली. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. ही तोडफोड महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप भाजपचा आहे. या आरोपींना पकडले नाही तर पोलिस स्टेशनला येऊन आंदोलन करणार असून दंडेलशाहीला दंडेलशाहीने उत्तर देऊ आणि पोल खोल आंदोलनाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था बिघडली तर पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असा इशारा भाजप नेते व विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
गुंडप्रवृत्ती हाताशी धरून पोल खोल आंदोलन दाबण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे. याप्रकरणी पुढील अर्ध्या तासात कारवाई झाली नाहीतर पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी ते म्हणाले, आज भाजपच्यावतीने मुंबईत पोलखोल अभियान सुरु केले आहे. त्याचा समारोप सायनला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कालपासून सुरु झालेल्या या अभियातून मुंबई महापालिकेत होत असलेला घोटाळा उघड करत आहे. लोकशाही पद्धतीने लोकांसमोर हे आम्ही मांडू शकतो. पण काही गुंडप्रवृत्ती हाताशी धरून आमचे पोल खोल आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप केला आहे. या मागे शिवसेनेचा हात आहे की काय हे पाहण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.