Saturday, July 20, 2024
Homeअध्यात्मसंत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो

संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो

प्रत्येकजण भक्ती करीतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले, तर भक्ती म्हणजे आवड. परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तीच करीत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून, देहबुद्धी वाढविणारी आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही. याकरिता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित, निष्काम, निःस्वार्थी परमात्मास्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धी विगलित होणे ही होय. देहरक्षण परमार्थप्राप्तीकरिता करावे. केवळ विषय सेवनाकरिताच जगणे असेल, तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट?

जयंत्यादी उत्सव आपण करतो, ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. मुळात प्रेम नसेल, तर ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो, तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते. पण त्यामुळे या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले, तर ते स्वतःकरताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे?

संत विषयात देव पाहतात. पण आम्ही मात्र देवातसुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली, म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. तेरा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते, असे म्हणतात. त्याचा अर्थ, तेरा कोटी जप व्हायला रोज दहा-बारा तास या प्रमाणात जवळजवळ दहा बारा वर्षे लागतात, इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही, तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे. मग ते विषयप्राप्र्तीकरिता असेल किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे. नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे.

– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -