एकदरा येथील ६० नौकांची मासेमारी ठप्प
मुरुड (वार्ताहर) : मुरुडच्या मच्छीमारांवर आधी अस्मानी संकट, पर्ससीन, एलईडी मासेमारीचे संकट संपत नाही तोच जेलीफिशचे अरिष्ट ओढावले आहे. त्यामुळे मुरुड आणि एकदरा येथील मासेमारी पुन्हा ठप्प झाल्याची माहिती मुरुड कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी सोमवारी बोलताना दिली. याप्रसंगी ज्येष्ठ मच्छीमार मनोहर मकू आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते.
मुरुड आणि एकदरा येथील सुमारे ६० नौका दररोज डिझेल खर्चून मासेमारीस जातात; परंतु त्या रिकाम्या हाताने परत येत आहेत. गेल्या महिन्यापासून ५० टक्के नौका समुद्रकिनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या आहेत. प्रत्यक्षात मासळीची फार भीषण स्थिती आहे. त्यामुळे नौका किनाऱ्यावर शाकारण्याच्या तयारीत मच्छीमार आहे. त्यात १ जूनपासून पावसाळी वातावरणामुळे मासेमारी पुढील दोन महिने बंद राहणार आहे.
आधीच तीन महिन्यांपूर्वी समुद्रात जेलिफिश आल्याने मासेमारी ठप्प होती. समुद्रात मासळीऐवजी जेलिफिश आधिक मिळत होती. आताही तीच परिस्थिती उद्भवली असून मासळीऐवजी जेलिफिश ७० टक्के मिळत आहे. दरम्यान, जेलिफिशच्या स्पर्शाने अंगाची लाहीलाही होत असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली आहे.
या वर्षात अवकाळी पाऊस, वादळी हवामान, वाढते प्रदूषण, बेकायदेशीर पर्ससीन, एलईडी मासेमारी यामुळे मासळीचा दुष्काळ सातत्याने होता. यातच जेलिफिशचे संकट दोन वेळा आले आहे. आता याच भागात जेलिफिश मोठ्या प्रमाणात असून मासे न मिळता जेलिफिश प्रचंड प्रमाणात सापडत आहेत. या जेलिफिशच्या स्पर्शाने अंगाची लाहीलाही होत असल्याची माहिती अनेक मच्छीमारांनी सोमवारी बोलताना दिली.
सरकारकडून आम्हाला मदतीचे कोणतेही पॅकेज नाही; परंतु आमच्यासारख्या सामान्य मच्छीमारांची कोणतीही दखल सरकार घेत नसल्याने मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वर्षभरात केवळ ३ महिनेच मच्छीमारी
दरम्यान, समुद्रात अचानक जेलिफिश कसे येतात, याबाबत निश्चित ठोस कारण नाही. मात्र जेलिफिश आल्यानंतर अन्य मासळी अजिबात मिळत नाही. यामुळे वर्षभरात केवळ ३ महिनेच मच्छीमारी होते, असे दिसून येते. मच्छीमारी व्यवसायातून हाजारो कोटींची उलाढाल आणि परकीय चलन देशाला मिळत असते. त्याच उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने पारंपरिक मच्छीमार संतापला आहे.
समुद्र उशाशी तरीही…
मुरुड व एकदरा येथील मच्छीमार रात्री ११ वाजता १० ते १५ वाव समुद्रात मासेमारीस जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मुरुड किनाऱ्यावर परत येतात. डिझेलचा खर्चही सुटत नाही, इतकी कमी मासळी मिळते. त्यातही जाळ्यात ८० टक्के जेलिफिश मिळतात. त्यामुळे मुरुड मार्केटमध्ये नेमकीच मासळी दिसून येते. समुद्र उशाशी असूनही मुरुड मार्केटमध्ये पालघर, डहाणू आणि अन्य भागांतून बर्फातील मासळी विक्रीस येते. यावरूनच मासळी दुष्काळीची गंभीरता लक्षात येते. त्यामुळे घराचा प्रपंच किंवा उदरनिर्वाह कसा चालवयाचा, असा सवाल रोजच येथील मच्छीमार बांधवांना पडत असल्याचे कोळीवाड्यातून दिसून येत आहे.