अमरावती : अचलपूरमधील घटना आणि १२ नोव्हेंबर रोजी अमरावतीत घडलेल्या मुस्लिम मोर्चामध्येही मंत्री यशोमती ठाकूर यांचा हात होता, असा खळबळजनक दावा भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर यांचा सहभाग असल्यामुळेच त्या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिमांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे. दरम्यान, आज अचलपूर घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने अमरावतीत निदर्शने करण्यात आली. त्यावेळी भाजप नेते अनिल बोंडे यांनी बोलताना हा दावा केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. पोलिसांनी याप्रकरणी २३ जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अचलपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी सध्या भाजप शहराध्यक्षांना ताब्यात घेण्यात आले आहे.