Friday, May 9, 2025

रायगड

माथेरानच्या वनसमिती आणि वनखात्यांचे वाहन पार्किंगकडे दुर्लक्ष

माथेरानच्या वनसमिती आणि वनखात्यांचे वाहन पार्किंगकडे दुर्लक्ष

मुकुंद रांजाणे


माथेरान : माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावरील जागा ही वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वाहनकर आकारणी केली जात असते. ही समिती फक्त वाहन कर घेण्यात व्यस्त दिसत असून येणारी खासगी वाहने कशाही पद्धतीने पार्क केली जात आहेत. पर्यटकांना गाड्या पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध आहे की नाही, याकडे नेहमीच दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी येत आहेत.


पर्यटक आपल्या किमती गाड्या अनेकदा जागेअभावी कुठेही जंगलात पार्क करत असतात. गर्दीच्या वेळी तर नवख्या पर्यटकांची खूपच त्रेधातिरपीट उडते. एकीकडे गाडी पार्किंगसाठी वेळ खर्ची होत असतो. त्यामुळे इथे येऊन आपण चूक तर केली नाही ना, असेच सूर त्यांच्याकडून ऐकावयास मिळतात. याचाही इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. दरम्यान, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव यांनी आपल्या शिष्टमंडळासह याठिकाणची परिस्थिती पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


वनसमितीने आजवरच्या कार्यकाळात विविध पॉइंट्सच्या सुशोभीकरणाकडे लक्ष केंद्रित केले होते. केवळ समितीच्या सदस्यांना कामे देऊन आपला कार्यभाग पूर्ण केला आहे; परंतु मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पार्किंगअभावी पर्यटकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याकडे दुर्लक्ष केले आहे.


दस्तुरी नाक्यावरील पार्किंग व्यवस्थापनेच्या नियोजनअभावी पर्यटकांना त्रासाला सामोरे जावे लागते. याकामी स्थानिक प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष घालून पर्यटकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करणे गरजेचे आहे.


- चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक, भाजप

Comments
Add Comment