Monday, March 24, 2025
Homeक्रीडालखनऊ-बंगळूरु आज आमनेसामने

लखनऊ-बंगळूरु आज आमनेसामने

पाचव्या विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक

नवी मुंबई (प्रतिनिधी) : लखनऊ आणि बंगळूरु यांच्यात मंगळवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघांनी यंदांच्या हंगामातील ६ पैकी ४ सामने जिंकले असून पाचव्या विजयासाठी लखनऊ आणि बंगळूरु सज्ज आहेत.

लखनऊ आणि बंगळूरु हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच आमने-सामने आलेले आहेत. यंदाच्या हंगामातील ६ पैकी ४ सामने जिंकून लखनऊच्या खात्यात ८ गुण आहेत. लखनऊचा कर्णधार लोकेश राहुल चांगलाच फॉर्मात आहे. शनिवारी झालेल्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात लोकेशने नाबाद शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. नेतृत्व आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर लोकेश यशस्वी ठरला आहे.

क्विंटॉन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा अशी तगडी फलंदाजी त्यांच्याकडे आहे. मार्कस स्टॉयनीस त्यांना चांगलाच उपयोगी पडत आहे. तो फलंदाजीसह गोलंदाजीही करत आहे. कृणाल पंड्या, आयुष बदोनी हे खेळाडूही अष्टपैलू कामगिरी करत आहेत. त्यामुळे लखनऊच्या फलंदाजीची घडी चांगलीच बसली आहे. जेसन होल्डर, आवेश खान हे वेगवान गोलंदाज निर्णायक क्षणी चांगली गोलंदाजी करत आहेत. कृणाल पंड्या, रवी बिश्नोई ही फिरकीपटूंची जोडी धावा रोखण्यासह मोक्याच्या क्षणी बळी मिळवण्यात यशस्वी ठरत आहेत. मार्कस स्टॉयनीस हा लखनऊसमोर उत्तम पर्याय आहे.

बंगळूरुनेही ६ पैकी ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले आहेत. फाफ डु प्लेसीसच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या बंगळूरुच्या संघाला नेतृत्वबदल फळल्याचे दिसत आहे. फाफ डु प्लेसीससह माजी कर्णधार विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, शहबाज अहमद, दिनेश कार्तिक अशा तगड्या फलंदाजांची मोट त्यांच्याकडे आहे.

हे सारे फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरत आहेत. दिनेश कार्तिकचा फॉर्म बंगळूरुसाठी फायदेशीर ठरत आहे. त्याने निर्णायक क्षणी धावा करून प्रभावी कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, हर्षल पटेल हे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे बंगळूरुच्या संघाचा समतोल झाला आहे.

ग्लेन मॅक्सवेलचे आगमन झाल्याने संघाला फलंदाजीसह गोलंदाजीतही एक पर्याय आहे. विस्फोटक फलंदाज वाढल्याने बंगळूरुच्या संघाची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.

वेळ : रात्री ७.३० वा. ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -