Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरपालघर तालुक्यात चिकनगुनियाची साथ

पालघर तालुक्यात चिकनगुनियाची साथ

खडकोली गावात आढळला रुग्ण

गावातील नागरिकांना तापाची लागण

बोईसर (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील खडकोली या गावात चिकनगुनियाची साथ पसरली आहे. या गावात अनेकांना ताप आल्याने रुग्णांच्या चाचणी अहवालात एक रुग्ण आढळून आला आहे. गावात तापाची साथ पसरल्याने नागरिक भयभीत आहेत. पाचजणांना लक्षणे असल्याचे दिसत आहे. त्यांचे अहवाल तपासणीसाठी डहाणू प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तेथून तपासणी अहवाल आल्यानंतरच त्यांना चिकनगुनिया आहे किंवा नाही हे समजणार आहे.

खडकोली गावात १०२३ लोकसंख्या असून २०७ घरे आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावातील अनेकांना तापाची लागण झाली असून अनेकांना अंगदुखीसारख्या लक्षणांना सुरुवात झाली आहे. यातील रुग्णांपैकी एका रुग्णाच्या तपासणी अहवालात तो चिकनगुनियाने बाधित असल्याचे समजले. त्यानंतर आरोग्य विभाग सजग झाला असून संपूर्ण गाव ‘साथ उद्रेक’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

गावामध्ये नागरिकांच्या घरात साठवलेल्या पाण्यामध्ये डास व डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापाची साथ पसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किटकजन्य आजार जाहीर केल्यामुळे या गावात सतर्कतेचा इशारा आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे.

या प्रकारानंतर आरोग्य विभागामार्फत दक्षता घेण्यात येत असून नागरिकांच्या तपासण्या केल्या जात आहेत. हा आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभाग व पथकामार्फत दररोज पाहणी करून उपाय योजना करीत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांनी म्हटले आहे.

जिल्हा परिषद व तालुका यंत्रणा गावात पोहोचलेले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, हिवताप अधिकारी गावात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहेत. तथापि, नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

– वैदेही वाढाण, अध्यक्षा, जिल्हा परिषद पालघर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -