मुंबई (प्रतिनिधी) : जोस बटलरचे धडाकेबाज शतक आणि युझवेंद्र चहलच्या विकेटची हॅटट्रीक या जोरावर राजस्थानने कोलकातावर सोमवारी ७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील पराभवामुळे कोलकाताने यंदाच्या हंगामातील पराभवाची हॅटट्रीक केली. राजस्थानच्या २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताची सुरुवात अडखळत झाली.
सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सुनील नरीन धावचीत झाला. त्यानंतर आरोन फिंच आणि कर्णधार श्रेयस अय्यरने या जोडीने कोलकाताला सावरलेच नाही तर विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. प्रसिद्ध कृष्णाने आरोन फिंचला बाद करत कोलकाताला दुसरा धक्का दिला. कृष्णाने २८ चेंडूंत ५८ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस एका बाजूने धावा जमवत होता मात्र दुसऱ्या बाजूने त्याला हवी तशी साथ मिळत नव्हती.
नितीश राणा सेट होत आहे असे वाटत होते. त्याने ११ चेंडूंत १८ धावा केल्या. मात्र त्यापुढे त्याला मैदानात टिकणे जमले नाही. धावा जमवतील अशी अपेक्षा असेलले रसल, व्यंकटेश अय्यर यांनीही अपेक्षाभंग केला. शेवटी चेंडू आणि धावा यातील अंतर वाढत चालले होते. त्यामुळे श्रेयसचाही संयम सुटला.
चहलच्या गोलंदाजीवर श्रेयस पायचीत झाला आणि राजस्थानच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असे वाटत होते. श्रेयसने ५१ चेंडूंत ८५ धावांचे योगदान देत कोलकाताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. युझवेंद्र चहलने विकेटची हॅटट्रीक घेत राजस्थानचा विजयावर जवळपास निश्चित केला होता. मात्र तळातील फलंदाज उमेश यादवने एकामागोमाग एक असे दोन षटकार आणि एक चौकार लगावत कोलकाताला मॅचमध्ये आणले. पण विजय मिळवणे त्याला जमले नाही.
शेवटी राजस्थानने सामना खिशात घातला. तत्पूर्वी कोलकाताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानची सुरूवात धडाक्यात झाली. जोस बटलर आणि देवदत्त पडीक्कल यांनी राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही कोलकाताच्या गोलंदाजांना धु धु धुतले. या जोडीने ९.३ षटकांत ९७ धावांची भागीदारी केली.
बटलरचे दुसरे शतक
राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर चांगलाच फॉर्मात आहे. बटलरने सोमवारी कोलकाताविरुद्ध शतक झळकावले. बटलरने या सामन्यात ६१ चेंडूंत १०३ धावा तडकावल्या. विशेष म्हणजे बटलरचे हे यंदाच्या हंगामातील दुसरे शतक आहे.
चहलची हॅटट्रीक
श्रेयस अय्यर, शिवम मवी आणि पॅट कमीन्स अशा कोलकाताच्या तीन फलंदाजांला लागोपाठ बाद करत युझवेंद्र चहलने विकेटची हॅटट्रीक घेतली. चहलने या सामन्यात ४ षटकांत ४० धावा देत ५ फलंदाजांना माघारी धाडले. चहलला विकेट मिळवण्यात यश आले असले तरी त्याला धावा रोखता आल्या नाहीत.