मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपकडून पोलखोल अभियान सुरू केले आहे. कांदिवलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने वातावरण तंग असतानाच चेंबूर येथे भाजपच्या या पोलखोल रथाची अज्ञातांनी तोडफोड केली. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. ही तोडफोड महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप भाजपचा आहे.
प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत चेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल यात्रेचा शुभारंभ होणार आहे. पण, त्यापूर्वीच या रथाची तोडफोड झाली आहे. महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी पोलखोल करत आहोत. त्यामुळे याचा त्रास महाविकास आघाडी सरकारला झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे केले आहे, असा आरोप भाजपच्या नगरसेविकेने केला आहे.
तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणूनच ही तोडफोड केली आहे. तत्काळ आरोपीला अटक केली नाहीतर आम्ही पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेनाच करू शकते, असे आरोप प्रसाद लाड यांनी केले.
दरम्यान, मुंबईत पोलखोल अभियान सुरू केले आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. महापालिकेत ३ लाख कोटी रुपयांच्या आसपास हा भ्रष्टाचार झाला आहे. तुमच्या भ्रष्टाचाराचे आम्ही पोलखोल करत आहोत. पण काही गुंडप्रवृत्त आमचं पोलखोल अभियान दाबण्याचा प्रयत्न करतात. आज कारवाई झाली नाहीतर आम्ही आंदोलन करणार. याप्रकरणी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार असेल, असे प्रविण दरेकर म्हणाले.