Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

सत्ताधाऱ्यांना पालिका कामांच्या उद्घाटनांची घाई

सत्ताधाऱ्यांना पालिका कामांच्या उद्घाटनांची घाई

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपला असून पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र तरीही गेला महिनाभर सत्ताधारी विविध महापालिकेच्या कामांच्या आणि लोकार्पणाच्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी सत्ताधाऱ्यांना उद्घाटनांची घाई लागली असल्याची चर्चा सुरू आहे.


दरम्यान मुंबई महानगरपालिकेचा ५ वर्षांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ ला संपला आहे. मात्र याआधी निवडणुका होणे अपेक्षित होते. पण ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आणि कोरोना आदी कारणांमुळे निवडणुका झालेल्या नाहीत. पालिकेचा कार्यकाळ संपल्याने आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी नवीन कामांचा शुभारंभ सत्ताधारी पक्षाकडून करण्याची घाई सुरू आहे. गेल्या महिन्याभरात गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर असलेल्या पुलाचे व सरकत्या जीन्याचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राणीबागेत बांधण्यात आलेले पिंजरे, सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे. तर गिरगाव येथील व्ह्यूइंगडेकचेही लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून उद्घाटन आणि लोकार्पणाच्या कामांचा सपाटा सुरू आहे.


दरम्यान सध्या पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती असली तरी कोणत्याही वेळी महापालिकेच्या निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आचरसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी पक्ष उद्घाटनाची घाई करत असल्याचे दिसून येते आहे. तर पालिकेने तयार केलेला प्रभाग रचनेचा आराखडा राज्य सरकारने रद्द केल्यानंतर नव्याने आरखडा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने त्याची तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या कार्यकाळात झालेली कामे लोकांना दिसावी आणि मतदारांना आकर्षित करता यावे यासाठी या कामांचे उद्घाटन केले जात असल्याचे बोलले जात आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या हालचाली पाहता निवडणूक लवकर होण्याची शक्यता आहे.


मुंबई महापालिकेची सत्ता बरखास्त झाली असली तरी विकासकामांच्या लोकार्पणात पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य
ठाकरे यांचा वावर जास्तच दिसायला लागला आहे. अनेक विकासकामांना नगर विकास मंत्र्याकडून उद्घाटन न होता आदित्य ठाकरेंच्या हस्तेच उद्घाटन होत आहे.

Comments
Add Comment