शिबानी जोशी
ईशान्येकडची राज्ये २५ वर्षांपूर्वीपर्यंत उर्वरित भारतापासून किती तुटलेली होती याचं उदाहरण अनेक जणांनी ईशान्येला गेल्यावर अनुभवलं असेल. संघाचे कार्यकर्ते जेव्हा त्या ठिकाणी एखादे काम करायला जात तेव्हा त्यांना तिकडचे स्थानिक पहिला प्रश्न विचारत, ‘‘आर यू फ्रॉम इंडिया?’’ म्हणजे ते स्वतःला भारतीय समजतच नसत. पण ही सात राज्यं भारतातीलच आहेत आणि त्यांना आपण मुख्य प्रवाहात आणले पाहिजे हे लक्षात घेऊन संघाच्या अनेक संस्था ईशान्येकडच्या सात राज्यांत खूप काम करत आहेत. त्या राज्यांत जाऊन प्रत्यक्ष काम करत आहेत, तिथे शाळांचं जाळं निर्माण केले आहे. त्या शाळातून आता अनेक विद्यार्थी, शासकीय अधिकारी, अगदी मंत्रीही झाले आहेत; परंतु त्या मुलांना इकडे आणून शिकवलं, तर ते आपोआपच भारतीय संस्कृतीशी मिसळून घेतील, हे लक्षात आल्यामुळे संघाचे प्रचारक गिरीश कुबेर यांनी डोंबिवलीतील काही कार्यकर्त्यांना नागालँडमधून येणाऱ्या मुलांसाठी आश्रम सुरू करावा, अशी विनंती केली. १९८३ पासून अभ्युदय प्रतिष्ठान नावाची संस्था डोंबिवलीमध्ये कार्यरत होती. त्याच संस्थेमार्फत कार्यकर्त्यांनी नागालँडमधल्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचं ठरवलं. त्यावेळी शिरीष आपटे यांना नागालँडमध्ये स्थिती पाहून घ्यायला सांगण्यात आले. ते जेव्हा तिथे उतरले तेव्हा त्यांना आर यू इंडियन? हाच प्रश्न विचारण्यात आला आणि त्यामुळे या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज तिथल्या तिथेच त्यांच्या लक्षात आली.
नागालँडच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करायचं, तर जागा हवी, त्यावेळी सहकार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश मराठे यांचा त्यावेळी बंगला रिकामा होता. सुरुवातीला या बंगल्यातच या मुलांची राहण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर वनवासी कल्याण आश्रमाची एक जुनी वास्तू उपलब्ध झाली. त्यात हे वसतिगृह सुरू करण्यात आले. १९९७ पासून हे वसतिगृह सुरू झाले असून आतापर्यंत ७५ ते ८० मुले शिकून गेली आहेत. दरवर्षी साधारण पंधरा ते वीस मुलं इथे येतात आणि दोन-चार मुलं दहावी किंवा बारावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. या मुलांसाठी राहाणं, जेवणं, शिक्षण ही सगळी सोय संस्थेतर्फे विनामूल्य केली जाते. या ठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण त्यांना दिलं जातं. त्यानंतर त्यातली काही मुलं आपल्या घरी म्हणजे ईशान्येकडे परततात आणि तिथे काहीतरी उद्योग, व्यवसाय, नोकरी सुरू करतात. उदाहरणार्थ, तिथल्या शिक्षण क्रमानुसार हिंदी शिकवणारे शिक्षक तिथे कमी मिळत असत. त्यामुळे त्या नोकऱ्या या मुलांना मिळू शकल्या आहेत, तर काही मुलं पुण्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी गेली आहेत. तिथेही शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसायात शिरावली आहेत.
पहिला मुद्दा असा की, हे विद्यार्थी तिथून इथे येतात कसे? तर ईशान्येकडच्या राज्यात संघाचे अनेक कार्यकर्ते प्रचारक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या असा एखादा होतकरू मुलगा लक्षात आला, तर ते अशा मुलाचं नाव सुचवतात आणि अभ्युदयचे कार्यकर्ते नागालँडला जाऊन त्यांना घेऊनही येतात. या मुलांच्या बाबतीत सर्वात मोठी अडचण भाषा आणि त्यांचे जेवण ही असते. तसेच वेगळ्या मुख अटीमुळे ते थोडे वेगळे दिसतात.त्यांची भाषा तर वेगळी आहेच, शिवाय त्यांना हिंदी आणि इंग्रजी ही खूप कमी येत आणि खाण्याच्या बाबतीत त्यांचं जेवण म्हणजे खरं तर ते कोणत्याही प्रकारचे प्राणी शिजवून खातात.
मराठी भाषा तर त्यांना अजिबातच येत नाही. त्यामुळे भाषेची अडचण येऊ नये म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात येतं. कारण मराठी शिकून त्याचा त्यांना काहीच फायदा होणार नाही. त्यांना आपल्या भागात जाऊन तिथे उपयोगी पडणारी भाषा शिकवायला हवी. त्यामुळे हिंदी आणि इंग्रजीत ज्ञान त्यांना दिलं जातं. खरं तर हे विद्यार्थी पक्के मांसाहारी आणि भात खाणारे असतात, म्हणून त्यांना आठवड्यातून दोन दिवस त्यांना मासाहार दिला जातो. आपल्या आणि तिकडच्या हवेतही खूप फरक आहे आणि त्यामुळे तिथलं इथे पचणार नाही म्हणून त्यांना आपल्याकडच्या अन्नाची हळूहळू सवय केली जाते आणि त्यांनाही आपलं जेवण नंतर नंतर आवडू लागतं असा अनुभव आहे.
या मुलांना त्यांची वेगळी असलेल्या चेहरेपट्टीमुळे त्यांना अनवधानाने बरोबरचे विद्यार्थी नेपाळी, चिनी असं म्हणत असतं आणि ही मुलं त्यामुळे मानसिकरीत्या स्थिर राहात नसत. हे लक्षात आल्यावर आपल्या इथल्या मुलांचं कौन्सिलिंग करून त्यांच्याशी समान वागणूक द्यावी असं सांगितलं जात असे, तेही आपल्या देशाचे नागरिक आहेत हे पटवून दिलं जात असे आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडे अशा दृष्टीने कोणीही पाहत नाही. स्थानिक आणि नागा विद्यार्थ्यांमध्ये आता मित्रत्वाचं नातं निर्माण झालं आहे. विद्यार्थ्यांचं झाल्यावर शिक्षकांनाही नागा विद्यार्थ्यांशी इतर स्थानिक विद्यार्थ्यांप्रमाणे समान पातळीवर वागा अशा तऱ्हेच्या सूचना दिल्या गेल्या. त्यामुळे आता ही मुलं सर्व कार्यक्रमात सहभागी होतात. व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या घरीसुद्धा येतात. दिवाळी, गणपती, ख्रिसमस एकत्र साजरी करतात. या मुलांसाठी वार्षिक उत्सवाचा कार्यक्रमही केला जातो. यात ही मुलं आपल्या कला सादर करतात. ती मुलं वारंवार आपल्या घरी जाऊ शकत नाहीत. कारण इथून नागालँड असा प्रवास जवळजवळ तीन दिवसांचा आहे. इतका मोठा प्रवास करून ही मुलं जेव्हा इथे विश्वास आणि येतात तेव्हा त्यांना आपलंसं करणं हे आपलं कर्तव्य आहे हे जाणून त्यांना संपूर्ण शिक्षण दिलं जातं. हीच मुलं पुढे आपल्या गावातल्या इतर मुलांना ही सर्व माहिती देतात. संस्कार देतात. एका अर्थाने हीच मुलं आपल्या कामाचा ब्रँड अँबेसिडर ठरतात. हे या मुलांना कार्यकर्ते जेव्हा नागालँडला घरी सोडायला जातात तेव्हा दिसून येतं आणि आपण करत असलेल्या कामाला पोचपावती मिळाल्याचे पाहून प्रोत्साहन मिळतं असं संस्थेचे पदाधिकारी बोंद्रे यांनी सांगितलं आणि ही मुलं कायमची जोडली जातात. खरं म्हणजे अभ्युदय प्रतिष्ठानची सुरुवात १९८३ चाली झाली. सुरुवातीला एक वाचनालय चालवले जात असे, त्यावेळी वसंतराव पराडकर, बापूसाहेब मोकाशी असे कार्यकर्ते एकत्र जमून हे काम करत होते. १९९९ नंतर मात्र संस्थेने ईशान्येकडील विद्यार्थ्यांच्या संगोपनाचे काम हाती घेतलं आहे, हे काम वाढवायचं असेल, तर नवीन इमारत बांधण्याचा देखील पुढची योजना आहे. समाजातील अनेक हात पुढे आल्यामुळे आणि संघ संस्कारातून निर्माण झालेल्या निरलस कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे कार्य अथकपणे पुढे जात आहे.