नवी दिल्ली(हिं.स.) : दिल्लीतील कुतुब मीनारजवळील २७ मंदिरे पाडून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली होती. कुतुब मीनारजवळ अनेक मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. ज्यामध्ये जवळच गणेश मंदिर आहे. यावरून सिद्ध होते की, तेथे गणेश मंदिरे होती, असा दावा इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी केला आहे.
कुतुब मीनारजवळ भगवान गणेश यांच्या एक नाही तर अनेक मूर्ती आहेत. ही जागा पृथ्वीराज चौहान यांची राजधानी होती. कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यासाठी तेथील सुमारे २७ मंदिरे पूर्णपणे नष्ट करण्यात आली. मंदिरे पाडल्यानंतर निघालेल्या दगडांपासून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बनवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्येही याचा उल्लेख आढळतो. यामध्ये २७ मंदिरे पाडून मशीद बांधल्याचे लिहिले आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे. कुतुब मीनार केवळ भारतातच बांधला गेला नाही तर त्याआधी तो समरकंद आणि गुफारामध्येही बांधला गेला होता, असेही के. के. मोहम्मद यांनी सांगितले.
के. के. मोहम्मद हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी प्रादेशिक संचालक राहिले आहेत. बाबरी मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचे त्यांनी प्रथम शोधून काढले होते. त्यांचे संशोधन १९९० मध्ये प्रथम प्रकाशित झाले. अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात के. के. मोहम्मद यांच्या संशोधनाने महत्त्वाची भूमिका बजावली.