Saturday, April 26, 2025
Homeदेशडेअरी संकुल व बटाटा प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

डेअरी संकुल व बटाटा प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

बनासकांठा (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील दीयोदर इथे नवीन डेअरी संकुल आणि बटाटा प्रक्रिया प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांसाठी 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. नवीन डेअरी संकुल हा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. हे सुमारे 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यास सक्षम असेल, सुमारे 80 टन लोणी, एक लाख लिटर आइस्क्रीम, 20 टन खवा आणि 6 टन चॉकलेट इथे दररोज तयार करता येतील.

बटाटा प्रक्रिया केंद्र फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, आलू टिक्की, पॅटीज इत्यादी प्रक्रिया केलेल्या बटाटा उत्पादनांचे विविध प्रकार तयार करेल, यापैकी बरेच इतर देशांमध्ये निर्यात केले जातील. हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम करतील आणि या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतील.

पंतप्रधानांनी बनास कम्युनिटी रेडिओ केंद्र ही राष्ट्राला समर्पित केले. हे कम्युनिटी रेडिओ केंद्र शेतकऱ्यांना कृषी आणि पशुपालनाशी संबंधित महत्त्वाची वैज्ञानिक माहिती देण्यासाठी स्थापन केले आहे. हे रेडिओ केंद्र सुमारे 1700 गावांतील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांशी जोडले जाईल अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधानांनी पालनपूर येथील बनास डेअरी प्रकल्पात चीज उत्पादने आणि व्हे पावडरच्या उत्पादनासाठी विस्तारित सुविधा राष्ट्राला समर्पित केल्या. तसेच, पंतप्रधानांनी गुजरातमधील दामा येथे स्थापित सेंद्रिय खत आणि बायोगॅस प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. खिमाना, रतनपुरा – भिल्डी, राधनपूर आणि थावर येथे स्थापन करण्यात येणाऱ्या 100 टन क्षमतेच्या चार गोबर गॅस प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल उपस्थित होते.बनासकांठातील लोकांच्या प्रयत्न आणि ध्येयासक्तीची त्यांनी प्रशंसा केली.

“बनासकांठामधील लोकांचे कठोर परिश्रम आणि समर्पित भावनेबद्दल मी त्यांचे कौतुक करू इच्छितो. या जिल्ह्याने ज्या पद्धतीने कृषी क्षेत्रात ठसा उमटवला आहे ते कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले, जलसंधारणावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचे परिणाम सर्वांनाच पाहायला मिळत आहेत.” असे ते म्हणाले.माता अंबाजीच्या पवित्र भूमीला नमन करून पंतप्रधानांनी आज आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी बनासच्या महिलांचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांच्या अदम्य भावनेबद्दल आदर व्यक्त केला. गावाची अर्थव्यवस्था आणि भारतातील माता-भगिनींचे सक्षमीकरण कशाप्रकारे बळकट होऊ शकते आणि सहकार चळवळ स्वावलंबी भारत मोहिमेला कसे बळ देऊ शकते हे येथे प्रत्यक्ष अनुभवता येते असे पंतप्रधान म्हणाले. काशीचे खासदार या नात्याने वाराणसीमध्येही संकुल उभारल्याबद्दल बनास डेअरी आणि बनासकांठामधील लोकांचे पंतप्रधानांनी आभार मानले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -