मुरुड (वार्ताहर) : फणसावाडी गावात देश स्वतंत्र होऊनही ७४ वर्षे झाली, तरीही गावातील पाण्याचा प्रश्न काही सुटत नाहीत. त्यामुळे या गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी, लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे लक्ष देणार कधी, असे अनेक सवाल येथील ग्रामस्थांना पडले आहेत.
मुरूडच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गारंबीपासून नजीक रोहा तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या भालगाव ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी गावात पाणीटंचाई कायम आहे. देश स्वतंत्र झाला तरी या गावाकडे लोकप्रतिनिधींनी कायमच दुर्लक्ष केले आहे. हे गाव डोंगराळ प्रदेशातील दुर्गम भागात वसले आहे. सुमारे १०० लोकसंख्या वस्तीचे हे गाव आहे. या गावातील ग्रामस्थांनी पाण्यासाठी विहीर बांधलेली आहे. ही विहीर डोंगर भागात असल्याने या विहिरीला पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असते. तथापि, फेब्रुवारीनंतर या विहिरीतील पाणी आटल्याने गावातील ग्रामस्थांना बैलगाडीने दोन मैल अंतरावरून गारंबीहून पाणी आणावे लागते.
तसेच महिलांना तीन किलोमीटरची पायपीट करून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागते. हे गाव दुर्गम भागात असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी कायम काणाडोळा करत आले आहेत, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
‘डोक्यावरील हंडा उतरवावा’
या गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष देऊन या गावातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सोडवावा व महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.