कुडूस (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील खैरे-अंबिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या वारणोळ येथील मोरे पाडा व कातकरीवाडी मध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे.
मोरेपाडा व कातकरीवाडी येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. गावापासून दूर अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. मोरेपाड्यात एक कूपनलिका असून खोली शासन निर्णयानुसार २०० फुटांपर्यंत असल्याने तिचेही पाणी आटले आहे. शेतात असलेल्या विहिरीचे पाणी गढूळ (अशुद्ध) असल्याने आम्हाला व आमच्या लेकरा-बाळांना साथीचे आजार नेहमीच होत असतात. आमच्या समोर दुसरा पाण्याचा पर्याय उपलब्ध नाही. लांबून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याने आमची मोठी दमछाक होत आहे.
आम्हाला शासनाने कूपनलिकेची व्यवस्था करून द्यावी. आमचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल दूर करावेत, अशी कैफियत महीलांनी यावेळी बोलताना मांडली. तालुक्यात खैरे-अंबिवली या ग्रामपंचायतीची लोकसंख्या अडीच हजार (२५००)च्या आसपास आहे. या ग्रामपंचायत हद्दीत १० गाव-पाडे येत आहेत. खैरे-अंबिवली हद्दीतील वारनोल येथील कातकरीवाडी व मोरेपाड्याची लोकवस्ती १५० च्या आसपास असून ती संपूर्ण आदीवासी लोकवस्ती आहे.
या पाड्यांना एक विहीर असून ती लोकवस्तीपासून दूर अंतरावर आहे. रस्त्याअभावी मोठी तारेवरील कसरत करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असून ती दूर करावी, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर होण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमअंतर्गत अस्तित्वातील नळपाणी योजनेची सुधारणात्मक पुनर्रचना होण्यासंदर्भात मी संबंधित खात्याकडे अवश्यक कागदपत्रांसह नेहमीच पाठपुरावा करत आहे. मात्र याबाबत शासकीय उदासीनतेचा फटका बसत आहे. – संदीप देशमुख, उपसरपंच, खैरे-अंबिवली ग्रामपंचायत