
कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी
वाडा (वार्ताहर) : तालुक्यात सध्या जंगल तस्करांनी थैमान घातले असून रातोरात मौल्यवान झाडे लंपास करत असल्याच्या अनेक तक्रारी उघडकीस होत असतानाच मुसारणे या गावातील शेतकरी वसंत पाटील यांच्या मालकी हक्काच्या जागेतील झाडे चक्क छापली असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, झाडे छापऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी वनक्षेत्रपालांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.तालुक्यातील चिंचघर पाडा येथे वसंत पाटील हे शेतकरी राहतात. त्यांची मुसारणे या गावाच्या हद्दीत गट नंबर २३८ ही जागा असून या जागेत खैर या जातीचे वृक्ष आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी ते जागेवर गेले असता त्यांना या जागेतील काही झाडे छापील असल्याचे दिसून आले. आजूबाजूला त्यांनी चौकशी केली असता त्यांना याबाबत समजले नाही. सदरची झाडे कोणत्या मालकी प्रकरणात छाटली असावीत, असा प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित केला आहे.