सलग सुट्ट्यांमुळे परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी
अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. माणगाव ते लोणेरे दरम्यान ही कोंडी झाली असून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
गुरुवार ते रविवार अशा सलग ४ दिवस सुट्ट्या आल्याने लोक फिरायला मोठ्या संख्येने बाहेर पडले तर परीक्षा संपल्याने अनेकांनी गावी जाण्याचा बेत आखला. गावोगावच्या देवदेवतांचे जत्रोत्सव, हनुमान जयंतीचा उत्सव यामुळे लोक कोकणात आपल्या गावी आले होते.
४ दिवसांची सुट्टी संपवून लोक पुन्हा मुंबईकडे परतत आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. माणगाव बाजारपेठ ते लोणेरे हायवे नाका इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. महाड ते कोलाड या तासाभराच्या प्रवासाला अडीच तास लागत आहेत. काही ठिकाणी महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे अर्धवट आहेत.
प्रत्येकाला मुंबईत लवकर पोहोचण्याची घाई होती. त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने चालवली जात आहेत. परिणामी ही वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलीस ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मात्र ही कोंडी सोडवायला पोलीस बळ कमी पडत असल्याचे दिसून येते त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.