उरण (वार्ताहर) : जेएनपीटी बंदराच्या वसाहतीमधील एका इमारतीचे छत कोसळण्याची दुर्घटना गुरुवारी (दि. १४) सकाळच्या सुमारास घडली. घरातील रहिवाशींच्या सजगतेमुळे ते थोडक्यात बचावले असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारचे कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशासन भवनाचे निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचे कामगार वर्गात बोलले जाते.
मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर जेएनपीटी हे जागतिक कीर्तीचे बंदर आहे. या बंदरात तसेच बंदरावर आधारित इतर प्रकल्पात काम करत असलेल्या कामगारांना वेळच्या वेळी कामावर हजर होता यावे, यासाठी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने जसखार ग्रामपंचायत हद्दीत भव्यदिव्य अशा सुसज्ज वसाहतीची उभारणी केली आहे. सदर वसाहतीमधील इमारतीची दुरवस्था झाल्याने बंदर प्रशासनाने मागील दोन वर्षांपूर्वी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला; परंतु, सदर इमारतीचे नव्याने करण्यात येत असलेले दुरुस्तीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने रहिवाशांच्या फ्लॅटमध्ये काही दिवसांतच पावसाचे पाणी झिरपू लागले.
तसेच काही इमारतींच्या प्लॉटच्या बांधकामाची पडझड सुरू झाली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते व रहिवाशांनी बंदर प्रशासनाकडे तक्रार दाखल करून वसाहतीमधील इमारतीचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी केली. तथापि, बंदर प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवाशांना वसाहतीत उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करत आपापल्या कुटुंबासह राहण्याची नामुष्की ओढवली आहे.
प्रशासन भवनाचे कामही निकृष्ट?
जेएनपीटी प्रशासन भवनाच्या नूतनीकरणासाठी ५२ ते ५४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तथापि, सदरचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे असल्याचे कामगारवर्गांनी सांगितले. याबाबत अधिकारीवर्गाशी संपर्क साधला असता ते नाव न छापण्याच्या अटीवर कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला आहे.