पुणे (हिं.स) : एखाद्या ग्राहकाने बिहारवरून पुण्याला रेल्वेने पार्सल पाठविले, तर पूर्वी त्याला दोन-तीन दिवसांनंतर पुणे स्थानकावर जाऊन त्याची चौकशी करावी लागत. परंतु, आता ही जुनी पद्धत हद्दपार होणार असून खासगी कुरिअर कंपन्यांच्या धर्तीवर ग्राहकाला त्याचे पार्सल कुठपर्यंत पोचले, हे मोबाईलवरून ट्रॅक करता येणार आहे.
आठ दिवसांत ‘पार्सल मॅनेजमेंट सिस्टीम’ (पीएमस) पुण्यात कार्यान्वित होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे ग्राहकांना आता स्थानकांवर हेलपाटे मारवे लागणार नाहीत.दुचाकी, पुस्तके, कलाकुसरीच्या वस्तू, अन्नधान्य, खाद्यपदार्थ, कपडे, चपला आदी वस्तूंची रेल्वेच्या पार्सलमधून वाहतूक होते. त्यातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, पार्सल वेळेवर न मिळणे, ते गहाळ होणे आदी प्रकारही घडत असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वेने आता पार्सल वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर ‘पीएमएस’ सेवा सुरू होत आहे. पुण्यात याबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आठ दिवसांत पूर्ण होणार असून त्यानंतर प्रवाशांना तत्काळ ही सेवा उपलब्ध होणार आहे.