मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाडमध्ये बदलत्या वातावरणामुळे भेंडीच्या पिकाला जोरदार फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरश: हवालदिल झाला असून भेंडी पिकाच्या एक्स्पोर्टला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भाग व आदिवासी पट्ट्यात विविध पिकाद्वारे भाजीपाला केला जात आहे; परंतु मागील दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या अगोदर मुरबाडमध्ये नामवंत म्हणजेच दुबई, अमेरिका, श्रीलंका, युरोप या देशात २०१४ ते २०१८च्या दरम्यान भेंडी पिकाला चांगला भाव मिळत होता; परंतु गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीच्या कालावधीत मुरबाडमधील भेंडी पिकाला आता ब्रेक लागला आहे.
तसेच मुरबाड तालुक्यातील कोरावळे, आबेळे (खु), वैशाखरे, शिदींपाडा, मानिवली, धसई, जामघर, शिवले, घोरले, बराड पाडा, किशोर, वांजले, यांच्यासह तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये भेंडीचे पीक घेतले जात आहे. परंतु यंदा भेंडीच्या पिकाची लागवड करण्यापूर्वीच सतत चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे यंदा भेंडी पिकाची लागवड उशिरा आहे. कारण जमिनीची मशागत दिली होती त्यावर अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याने शेतकरी वर्गाला जमिनीची दुबार मशागत करावी लागली होती. त्यामुळे यंदा भेंडीच्या पिकामुळे शेतकऱ्याला फायदा नसून यंदा तोटा सहन करावा लागत आहे.
तसेच मुरबाड तालुक्यात भेंडीबरोबर मिरची, काकडी, कारली, कांदा या भाजीपाल्याची लागवड केली आहे, तसेच २००च्या आसपास उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यातीकरिता ऑनलाईन नोंदणी मुरबाड कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे. अशी माहिती मुरबाड कृषी विभागाने दिली आहे.
मुरबाड तालुक्यातील प्रामुख्याने इतरही विविध भाजीपाल्याची पिके घेतली जात असली तरी भेंडीचे पीक हे नामवंत पीक असल्याने सर्वच ठिकाणी भेंडीचे पीक घेतले जात आहे; परंतु यंदा भेंडीच्या पिकाला डिसेंबर, जानेवारी दरम्यान प्रति किलो ४० रुपयाचा भाव होता; परंतु यंदा उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणि राज्यस्तरावर व देश स्तरावर भेंडीच्या मार्केटला फारसा भाव मिळत नाही; परंतु यंदा मार्च, एप्रिल दरम्यान भेंडीचाच्या भावात मोठी घट झाली आहे. तो भाव प्रति किलो २० रुपये वर आले आहे. त्यामुळे अक्षरशः मुरबाडमधील शेतकऱ्यांचे भेंडीच्या पिकाबाबत फार मोठे नुकसान झाले.