मुंबई (प्रतिनिधी) : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला यंदा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वर्षांकरिता आरटीई प्रवेशाच्या एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी दोन लाख ८२ हजार ८३ अर्ज आले आहेत. यातील आतापर्यंत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आरटीईअंतर्गत प्रवेश निश्चितीसाठी केवळ तीन दिवस उरले असताना आतापर्यंत फक्त १४ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम २००९ नुसार, प्राथमिक शिक्षण संचलनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पालकांचे लक्ष याकडे लागलेले असते. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ९ हजार ८६ शाळांमध्ये १,०१,९०६ जागा आहेत. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांकरिता आरटीई प्रवेशसाठी दोन लाख ८२ हजार ८३ अर्ज आले आहे. यातील आतापर्यंत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
यातील केवळ १४ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असून, अजूनही ८७ हजार ३०२ जागा रिक्त आहेत. सुट्ट्या आल्याने प्राथमिक शिक्षण संचलनालयाला प्रवेशांसाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी लागणार आहे. पुण्यात सर्वाधिक अर्ज आले आहेत.
आरटीई प्रवेशाला दर वर्षी पुण्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील ९५७ शाळांमध्ये १५ हजार १२६ आरटीईच्या जागाकरिता ६२ हजार ९६० अर्ज केले आहेत. १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यातील २ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केला आहेत.