मुंबई (प्रतिनिधी) : संजय राऊत ही वैफल्यग्रस्त व्यक्ती असून, ते रोज दिवसभर काहीतरी बोलत असतात. कारण त्यांना काही कामे नाहीत. मात्र आम्हाला कामे आहेत. ते मोकळे आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना उद्देशून व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे.
२०२४ कोल्हापूरची ती जागा आम्हीच जिंकू. काल उत्तर कोल्हापूर मतदारसंघाचा निकाल लागला आहे. यात भाजपचा पराभव झाला असून, त्यावर देखील फडणवीस यांनी भाष्य केले आहे. आम्ही आम्हाला मिळालेल्या मतावर समाधानी असून, आम्ही एकटे लढलो. ते तिघे लढले तरी आम्हाला तेवढी मत मिळाली. २०२४ ला आम्ही ही जागा नक्की जिंकू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मताधिक्याने पराभव केला. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूरला पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत जाधव यांना ९७,३३२, तर कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. कोल्हापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
मनसेप्रमुख राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याशिवाय, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा देखील अयोध्या दौरा लवकरच असणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “अयोध्येचा दौरा हा कोणीही करायला हरकत नाही, कारण प्रभू श्रीराम हे आपले दैवत आहे आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी जर कोणी जाणार असेल, तर त्याचे स्वागतच आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी जात असतो आणि मला असे वाटते की कुठल्याही व्यक्तीला तिथे जावसे वाटणे यामध्ये काही गैर नाही.