मुंबई : सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे मिळून या गाईडलाईन्स तयार करणार आहेत. येत्या एक-दोन दिवसात या गाईडलाईन्स जाहीर होतील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी सांगितले. या गाईडलाईन्स नुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ही नियमावली जारी केली जाईल, असे ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या विधानाने राज्यात राजकीय वातावरण पेटले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. मात्र आता राज्य सरकार या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत असून राज्याचे पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. त्यानुसार येत्या १-२ दिवसांत भोंग्यांबाबत नियमावली जारी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
तसेच राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. गृह विभाग प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कुणीही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सोशल मीडियावर पसरणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत धार्मिक भावना दुखावणाऱ्या एकूण ३ हजाराहून अधिक पोस्ट डिलीट केल्या गेल्या आहेत. जर कुठल्याही प्रकारे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई करणार असल्याचेही दिलीप वळसे पाटलांनी सांगितले.