विनायक बेटावदकर
कल्याण-डोंबिवली महापालिकेला प्रशासकीय काळ काही नवीन नाही. १९८३ मध्ये महापालिका निर्मितीनंतर १२ वर्षे काही ना काही कारणांनी १९९५ पर्यंत निवडणुका झाल्याच नाहीत. प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधी नसतील तर कसा एककल्ली कारभार चालतो. त्यातून शहर विकासाची कशी वाट लागते. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागतो, याचा अनुभवही महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी घेतला. या काळात प्रशासक हटाव आंदोलन जसे झाले, तसेच यूपीएस मदान यांच्या काळात कामे पूर्ण होईपर्यंत त्यांना बदलू नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे आग्रह धरण्यात आला. महापालिका क्षेत्रात बाहेरचे बांधकाम व्यावसायिक येऊन काहींनी ग्रामीण क्षेत्रात अवैध बांधकामे केली, त्याचा महापालिकेत लोकप्रतिनिधी आल्यावर त्यांना त्याच्या विकासकामात कसा त्रास सहन करावा लागला याचाही अनुभव घेतला.
माजी महापौर स्व. राजेंद्र देवळेकर यांच्या प्रयत्नाने महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प आला. पण शहर विकासाला शहरात किंवा ग्रामीण भागात मोकळ्या जागा राहिल्या नाहीत. राखीव जागांवरही बांधकामे केली गेली. त्या सर्वांचा परिणाम आता स्मार्ट सिटीच्या कामात भोगावा लागत आहे.
विद्यमान प्रशासक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे कामाच्या बाबतीत वेगळे निघाले. त्यांनी परिस्थितीतून मार्ग काढत शहर विकासाचे अनेक यशस्वी प्रयोग केले. इतकेच नव्हे तर ५ मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्यदायी योजना, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन म्हणूनम क्रीडांगणात वाढ, प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न, शहर स्वच्छतेसाठी विशेष प्रयोग. परिवहन आणि महापालिकेच्या शिक्षण विभागात शालाबाह्य मुलांसाठी स्वतंत्र योजना तयार करून त्या अमलात आणण्यासाठी स्वत:च लक्ष घातले आहे. शाळांना भेटी देऊन प्रयत्न सुरू केले. हे सर्व करताना आयुक्तांनी करवाढीचा कोणताही भार नागरिकांवर टाकलेला नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे. या अर्थसंकल्पातून त्यांनी ‘माझे शहर सुदृढ शहर’ अशी घोषणा केली आहे. मालमत्ता कर, नगर रचना, पाणीपुरवठा, महापालिकेच्या मालकीच्या मालमत्ता भाड्यातून, पार्किंगच्या जागा यातून त्यांनी उत्पन्न वाढीचे मार्ग सुचवले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळी सुविधायुक्त मैदाने, रस्ते, उड्डाणपूल, सौर ऊर्जा यातून शहराचे सौंदर्यीकरण, महापालिका क्षेत्राची वाढती लोकसंख्या, नव्या उंच इमारतींची बांधकामे लक्षात घेऊन अग्निशमन दलात वाढ. त्यात आधुनिकता आणण्याचे प्रयत्न, शहरातील तलावांचे सुशोभीकरण, शहरात खाडी किनारी व ग्रामीण भागात येणाऱ्या परदेशी पक्षी निरीक्षणासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी उंच मनोरे, आकाशाचा अभ्यास करण्यासाठी तारांगण, दिव्यांगांसाठी खास उद्यान, वाहतूक गार्डनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक शिक्षण, अशा अनेक सुधारणा नागरी जीवन सुसह्य करण्याच्या कल्पना त्यांनी मांडल्या आहेत.
डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडांगणात आधुनिक क्रीडा साधनांची सोय केली जाणार आहे. शिवाय खंबाळपाडा येथे क्रीडापटूंसाठी नवीन क्रीडासंकुल उभारण्याचा प्रयत्न राहील. त्यात बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, अॅथेलेटिक्स, इनडोर कबड्डी, फुटबॉल. स्टेडियमची सोय असे अनेक उपक्रम करण्याचा डॉ. विजय सूर्यवंशींनी या अंदाज पत्रकातून संकल्प व्यक्त केला आहे.
कल्याण महापालिकेच्या रुग्णालयात आज अनेक सुधारणा केल्या जात असल्याचे सांगितले जाते. प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया विभाग, सामान्य रुग्णालय, अतिदक्षता विभाग, अत्यवस्थ रुग्णावर तातडीच्या उपचाराची सोय, या अर्थसंकल्पातून केली.
गेल्या वर्षापासून शहर स्वच्छतेवर भर देऊन खाडी किनारच्या कचरा डेपोचा (डम्पिंगचा) प्रश्न जवळ जवळ निकाली निघाला आहे. शहरात कचरा वर्गीकरणाच्या कामाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फक्त कल्याण-डोंबिवली शहरात स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचा प्रश्न आणि कल्याण पश्चिमेला स्टेशन रोडवरील भाजीमार्केटच्या स्वच्छतेचा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे. फेरीवाल्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शहराच्या विकसित भागात वाहतुकीला अडथळा येणार नाही, अशा प्रकारे त्यांना फेरीवाला क्षेत्र तयार करून देणे, त्याबरोबरच खडकपाडा, गोदरेज हिल, लालचौकी आधारवाडी, उंबर्डे, वाडेघर.
तसेच पूर्वेला, डोंबिवलीत निरनिराळी संकुले यातून छोटे- छोटे गाळे काढून त्यात विक्रेत्यांची सोय करता येणार नाही का? पूर्वी माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांनी असे प्रयत्न केले आहेत. त्यांना फेरीवाल्यांची साथ मिळाली नाही. तेव्हा स्थानिक फेरीवाल्यांना प्राधान्य देऊन फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. या सर्व कामांसाठी महापालिकेत येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती हवी ती आज दिसत नाही. प्रशासक आयुक्तांनी त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ पत्रकार (कल्याण)