
प्रशांत जोशी
डोंबिवली : ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरणाचा समतोल राखा’ अशा आशयाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी शासन, प्रशासन नेहमीच आघाडीवर असते. पण देशी की विदेशी झाडांचे वृक्षारोपण करावे, यावर चर्चा होत असून, यावर समाजमाध्यमातूनही जनजागृती केली जात असून विदेशी झाडांचे वृक्षारोपण करू नका, असे जाहीर सांगण्यात येत आहे.
परदेशातून भारतात आलेल्या गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आसपासची जमीन नापीक केली आहे.
परिणामी विदेशी झाडे आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे. या झाडांच्या फुलांत परागकण नसल्यामुळे त्यावर फुलपाखरांसारखे कीटक येत नाहीत. या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही. रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा पक्ष्यांचा वावर दुर्मीळ झाला आहे. पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी, अन्नसाखळी कमकुवत होतेय. परदेशी झाडांची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय, बैल, शेळीसुद्धा खात नाहीत. माकडेही परदेशी झाडांवर बसत नाहीत. यामुळे अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे हे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत.
पण देशी झाडे पिंपळ, कडुलिंब आणि वटवृक्ष पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक सामावलेले असतात. पक्ष्यांना, किड्यांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो. त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाऊस, चुकलेला उन्हाळा, पावसाळा, थंडी यांचे चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेऊन जात आहे.
मात्र पांगारा, सावर, सीताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस, आवळा, आंबा, कवठ, बेल, मोह, पळस ही झाडे न लावता निव्वळ फोटोसाठी चुकीचे वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही. यामुळेच देशी आणि विदेशी झाडांमधील फरक स्पष्टता समाजमाध्यमांवर पाहण्यात येत असून आता याबाबतचे धोरण प्रशासनाने निश्चित करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.