Tuesday, October 8, 2024
Homeमहामुंबईमहापालिकेचा हेल्पलाइन नंबर ठरतोय कुचकामी?

महापालिकेचा हेल्पलाइन नंबर ठरतोय कुचकामी?

तक्रारी करूनही चार दिवस टाटा हॉस्पिटलजवळील शौचालयाला टाळेच

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निवारण तत्काळ करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून १९१६ ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मात्र, या हेल्पलाइनवर केलेल्या तक्रारीला स्थानिक वॉर्डमधून प्रतिसाद मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक तक्रारी करूनही टाटा हॉस्पिटलजवळील कबीर स्नानगाव व शौचालयाला गेले चार दिवस महापालिकेच्या संबंधित खात्याकडून टाळे लावण्यात आल्याने टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल झाले आहे.

टाटा हॉस्पिटलच्या दोन इमारतींना जोडणाऱ्या पुलाखालील रस्त्यावर सदर शौचालय असल्याने टाटा हॉस्पिटलमधील रूग्णांचे नातेवाईक, पादचारी, टॅक्सीचालक यांना सोयीस्कर वाटते. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईबाहेरून आलेल्या आंबेडकरवादी अनुयायांची दादर, परळ परिसरात मोठी गदी होती. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक शौचालय बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक जागरूक नागरिकांनी हेल्पलाइनवर संपर्क साधून शौचालय सुरू करण्याची मागणी केली. संबंधित तक्रार स्थानिक वॉर्डमध्ये कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले .परंतु, चार दिवस उलटूनसुद्धा एफ दक्षिण विभाग कार्यालयाकडून रविवारपर्यत शौचालय पुन्हा उघडले करण्यात आलेले नाही, असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मुंबई महापालिकेकडून सामाजिक संस्थांना शौचालये बांधून त्यावर देखरेख करण्याचे काम देण्यात येते. हा शौचालय बांधण्याचा खर्चही संबंधित संस्थेला सुरुवातीला करावा लागतो. त्यानंतर, महापालिकेने आकारलेल्या दराप्रमाणे शौचालयाचा वापरकर्ताकडून पैसे घेण्याचे संस्थेला बंधनकारक असते. त्यातून तेथील नेमलेल्या कामगारांच्या पगारांपासून सर्व व्यवस्था संस्थेला पाहावे लागते, असे असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पोटशुळ का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शौचालयाला टाळे लावण्यात आल्याने टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -