मुंबई : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (४२) यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या नेमकी का केली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कुर्ल्याच्या नेहरू नगर परिसरात कुडाळकर कुटुंब वास्तव्यास आहे.
नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बाबल यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी कुडाळकर यांच्या पहिल्या पत्नीचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी रजनी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत. वर्षभरापूर्वी कुडाळकर यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचा कुर्ला परिसरात अपघाती मृत्यू झाला होता. रजनी यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. रजनी यांच्या मुलाचं काही महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यामुळे त्या खचल्या होत्या, अशीही माहिती आहे. दरम्यान, रजनी यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आमदार कुडाळकर यांच्याशी संपर्क करून त्यांचे सांत्वन केले. नार्वेकर यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही दिली आहे.