ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी सकाळपासून पाचपाखडी परिसरातील विविध भागांना भेटी देऊन तलाव सुशोभीकरण, रस्ते आणि साफसफाई कामाची पाहणी केली. या दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्तांनी साफसफाई, स्वच्छता, अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स कारवाई अधिक गतीने करण्याचे निर्देश संबधितांना दिले.
या पाहणी दौऱ्यास माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी. जी. गोदेपुरे, उप आयुक्त शंकर पाटोळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.
पाचपाखडी, नामदेववाडी तसेच चंदनवाडी या परिसरात ठिकठिकाणी परिसर सुशोभीकरण करणे, कचराळी तलाव व उद्यानाच्या डागडुजीचे कामे करणे, रस्त्याची दुरुस्ती करणे, रस्ते दुभाजकामध्ये वृक्ष लागवड करणे, रस्ते दुभाजक दुरुस्ती, अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर नियमित कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित विभागास दिले.
तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी, डेब्रिज उचलणे, रंगरंगोटीच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करणे यासोबतच या परिसरातील सर्व उद्यानाची आवश्यक डागडुजीचे कामे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान सिद्धेश्वर तलावाची देखील महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी पाहणी करून या ठिकाणी संपूर्ण परिसराची स्वच्छता, तलावातील संपूर्ण गाळ काढण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करून इतर अत्यावश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले.