Wednesday, March 26, 2025
Homeमहत्वाची बातमीगृह विभागाकडून भोंगे हटवण्याच्या हालचाली सुरू

गृह विभागाकडून भोंगे हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावे असा इशारा दिला आहे. त्यासाठी सरकारने मौलवींशी चर्चा करावी असेही राज ठाकरेंनी सांगितले होते. त्यानंतर आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बेकायदेशीर भोंगे हटवण्याबाबत गृह विभागाने सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलीस महासंचालक बैठक घेणार आहेत. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यातही बैठक होणार आहे.

सर्वधर्मीय सलोखा ठेवणे हा पोलिसांचा हेतू आहे. कुणालाही भोंगे अथवा स्पीकर लावायचे असतील तर त्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे असा निर्णय गृह खात्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस महासंचालकांच्या बैठकीला सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे. कायद्याचे पालन सर्वांसाठी आहे. त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही बैठक आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृह विभाग सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

तत्पूर्वी नाशिक पोलिसांनी भोंग्यांबाबत नोटीस जारी केले आहे. नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी आदेश जारी केले आहे. सर्व धार्मिकस्थळावरील भोंगे, स्पीकरची परवानगी घेणं बंधनकारक आहे. ३ मेनंतर बेकायदेशीर भोंगे हटवण्यात येतील. जर कुणाला हनुमान चालीसा पठण करायचं असेल तर ते मशिदीपासून १०० मीटर अंतरावर आणि दोन्ही एकाचवेळी वाजवू नये. अजानपूर्वी किंवा नंतर १५ मिनिटांनी हनुमान चालीसा लावली तरी हरकत नाही. कुणीही बेकायदेशीर भोंगे लावले तर ४ मेपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करून भोंगे जप्त करण्यात येतील. जो कोणी बेकायदेशीर भोंगे लावेल त्यांना ४ महिने ते १ वर्ष कारावास भोगावा लागू शकतो.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवावे अशी मागणी केली होती. ३ मे पर्यंत भोंगे हटले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी त्याचा पुनरुच्चार करत “देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतो, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ. त्यामुळे आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -