पुणे (हिं.स) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वारंवार तसेच वीकेंडला होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. वाहतूक कोंडीच्या वेळी महामार्गावर वाहनांच्या रांगा न लागता, त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून ती वाहने पुन्हा महामार्गावर येतील, अशी व्यवस्था करण्यावर भर दिला गेला आहे.
द्रुतगती मार्गावर २६ मार्च रोजी किवळे ते पनवेल या ९४ किलोमीटरच्या परिसरात तब्बल आठ तास वाहतूक कोंडी झाली होती. अमृतांजन पॉइंटजवळ बोर घाटात टॅंकरचा अपघात झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर तातडीने महामार्ग पोलिसांनी हा आराखडा तयार केला आहे.
योजनेचा उद्देश विशेषत: आपत्कालिन परिस्थितींना तोंड देण्यासाठी आणि वाहनचालकांच्या त्रासाला कमी करण्यासाठी आहे. यात एक्स्प्रेसवेला १५ विभागांमध्ये विभागले गेले आहे.