नवी मुंबई (प्रतिनिधी) : पालिका परिवहन उपक्रमाकडून तुर्भे आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पास सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात आली. पण या ठिकाणी पास काढण्यासाठी आलेल्या घटकांना बसण्यासाठी आसरा नसल्याने त्रासाचा सामना करावा लागत आहे.
उन्हापासून सुरक्षा मिळावी व बैठक व्यवस्था करावी, अशी मागणी दिव्यांग नागरिक करत आहेत. आसन व्यवस्था नसल्याने दिव्यांगांना ताटकळत उभे राहावे लागते. आताच्या घडीला उन्हाच्या झळांमुळे दिव्यांग नागरिक कासावीस होत आहेत. पावसाळ्यातही दिव्यांग नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे. यासाठी सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी दिव्यांग करत आहेत.
स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक देखील येथे पास काढण्यासाठी येत असतात. त्यांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात.
मी चाळीस टक्के अस्थिव्यंग दिव्यांग आहे. मी स्वतः पास काढण्यासाठी गेले होते. पास काढताना फोटो काढला जातो. त्यामुळे पास काढताना स्वतः हजर राहावे लागते. त्यावेळी भर उन्हात उभे राहावे लागले व पास काढायला लागला.
– पी. टी. भालेकर, दिव्यांग