नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा फटका पुन्हा एकदा विमानसेवांवर दिसू लागला आहे. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून हाँगकाँगला जाणारी विमान सेवा २३ एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहे. फ्लाइटमध्ये तीन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर हाँगकाँगने फ्लाइटवर बंदी घातली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्रवासाच्या 48 तास आधी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरच भारतातील प्रवासी हाँगकाँगला जाऊ शकतील, असे सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हाँगकाँगमधील विमानतळ परिसरात आल्यावर कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
एका रिपोर्टनुसार, 16 एप्रिल रोजी एअर इंडियाच्या AI316 दिल्ली-कोलकाता-हाँगकाँग फ्लाइटमध्ये उपस्थित तीन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला आहे.
दोन वर्षांच्या प्रदीर्घ बंदीनंतर 27 मार्च रोजी भारताकडून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांकडून नव्याने जाहीर कोविड-19 निर्बंधांमुळे आणि मर्यादित मागणीमुळे एअर इंडियाने हाँगकाँगला जाणारी विमानसेवा 24 एप्रिलपर्यंत रद्द केली असल्याचे एअर इंडियाने ट्वीट करत सांगितले आहे.