मुंबई : आयपीएलच्या १५व्या हंगामाची वाटचाल ही १४व्या हंगामाच्या दिशने होत आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील फिजिओ पाठोपाठ आता एका खेळाडूला कोरोना झाला आहे. तर सपोर्ट स्टाफमधील अन्य एकाला कोरोनाची लक्षणे आढळली असून त्याचा रिपोर्ट मात्र अद्याप आला नाही.
आयपीएलच्या १४व्या हंगामात अशाच प्रकारे कोरोनाचा शिरकाव झाला होता. तेव्हा बीसीसीआयवर स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली होती. ४ मे २०२१ रोजी आयपीएल २०२२चा हंगाम स्थगित करण्यात आला होता. तेव्हा सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोना झाला होती. स्पर्धा स्थगित झाली तेव्हा फक्त २९ लढती झाल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईमध्ये सहा महिन्यांनी आयोजित केला. कोरोनामुळे आयपीएल २०२०चे आयोजन देखील युएईमध्ये करण्यात आले होते.
आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत २९ सामने झाले आहेत. गुणतक्त्यात प्रथमच सहभागी झालेला गुजरात टायटन्स संघ अव्वल स्थानी आहे. तर पाच वेळा विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्सचा संघ अखेरच्या म्हणजे १०व्या स्थानावर आहे. मुंबई पाठोपाठ ४ विजेतेपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ नवव्या स्थानावर आहे. दिल्ली संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने संपूर्ण संघ हॉटेलमध्ये क्वारंटाइन झाला आहे. अशात सोशल मीडियावर दोन संघाच्या चाहत्यांनी स्पर्धा स्थगित करण्याची मागणी केली आहे. हे चाहते म्हणजे अन्य कोणी नाही तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे होय.
मुंबई आणि चेन्नई यांनी मिळून आयपीएलची ९ विजेतेपद मिळवली आहेत. पण या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी खराब झाली आहे. मुंबईने खेळलेल्या सहा पैकी सहा सामने गमावले आहेत. तर चेन्नईने ६ पैकी ५ सामने गमावले आहेत. अशाच जर स्पर्धा स्थगित झाले तर सर्वात मोठा फायदा या दोन संघांना होऊ शकतो. दोन्ही संघांना रणनिती ठरवण्यासाठी वेळ मिळले.