मुंबई : रिझर्व्ह बँकेने १८ एप्रिल, २०२२ पासून बँका उघडण्याच्या वेळेत बदल केला आहे. यापुढे बँका दररोज सकाळी ९ वाजता उघडणार आहेत. कोरोना महामारीमुळे रिझर्व्ह बँकेने उघडण्याची ही वेळ एका तासाने कमी केली होती. आता पुन्हा ही वेळ नियमित केली आहे. यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार असून ग्राहकांना सकाळचा एक तासाचा अधिकचा अवधी मिळणार आहे. आता सर्व बँका ९ ते ४ या वेळेत सुरु रहातील.
आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरेस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. याशिवाय अन्य बाजार देखील आजपासून १० ऐवजी सकाळी ९ वाजता उघडणार आहेत.
आरबीआयने सर्व बँकांना कार्डलेस एटीएम व्यवहाराची सुविधा लवकरच सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना लवकरच यूपीआय द्वारे बँक आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.
कार्डलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय हे पाऊल उचलत आहे. यासाठी सर्व बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा यूपीआय द्वारे दिली जाईल.
कार्डलेस कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये एटीएम पिनऐवजी मोबाइल पिन वापरला जाईल, ज्यामुळे एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे व्यवहार सोपे होतील आणि कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड चोरी आणि इतर अनेक प्रकारची फसवणूक टाळता येईल. एसबीआय सारख्या काही बँका आधीपासूनच अशाप्रकारची सेवा देत आहे.