प्रियानी पाटील
खरं तर ‘रांगोळी’ पाहिली की कुणालाही ती काढण्याचा, रेखाटण्याचा मोह आवरत नाही. मनासारखी रांगोळी आपल्यालाही यावी आणि तीही अगदी सुबकतेने असे प्रत्येकीला वाटते. पण हवी तशी जमतच नाही. बरेचदा संस्कार भारतीच्या रांगोळ्या मन वेधून घेतात. पण आपल्याला का नाही जमत? असे वाटणाऱ्या गृहिणी, मुली सर्वांच्याच मनातले ओळखून मूळ विजयदुर्ग आणि विवाहानंतर सध्या भिवंडी येथे वास्तव्यास असलेली स्वाती वाडये-तारळकर हिने खास प्लास्टिक मोल्डच्या डिझाईन्स स्वाती क्रिएशन्सद्वारे साकारून सर्व गृहिणींचे काम एकदम सोपे केले आहे. या कल्पनेतूनच स्वाती हिने कलेचे एक नवे द्वार खुले केले आहे.
संस्कार भारतीची चिन्हे सर्वांनाच जमत नाहीत. त्यामुळे बहुतेकजणी निराशही होतात. सगळ्यांनाच कामाच्या व्यापातून कोर्स करणे शक्य होत नाही. अशा महिलांसाठी संस्कार भारतीची चिन्हे स्वातीने बनवली. नवनवे डिझाइन्स गोपद्म, स्वस्तिक, अशाप्रकारे २९ चिन्हांच्या डिझाइन्स स्वाती हिने बनवल्या आहेत. इतकेच नाही तर आठवड्याच्या वारांच्या डिझाइन्सदेखील तिने बनवल्या आहेत. या डिझाइन्स केवळ आपल्या दारी जमिनीवर ठेवल्या की, त्यात रंग भरायचे. हे डिझाइन्स शुभ्र रांगोळीसारख्या पांढऱ्या रंगातच स्वातीने साकारले आहेत. कारण ओरिजनल सफेद रंग हा रांगोळीचा बेस टिकण्यासाठी तो तसाच जपण्याचा एक प्रयत्न यातून असून रांगोळी रेखाटल्यानंतर तिचे खरे स्वरूप डोळ्यांना तसेच दिसणे जरुरी असल्याचे स्वाती सांगते.
या रांगोळीच्या डिझाइन्स प्लास्टिक पावडरपासून बनवल्या जातात. कारण टाकाऊ प्लास्टिकच्या पुन:निर्मितीतून बनवण्यात येणाऱ्या पावडरपासून हे रांगोळी डिझाइन्स तयार केले जातात. यासाठी स्वाती घर सांभाळून दुपारी ऑफिस सांभाळते. यावेळी ऑर्डरप्रमाणे मोठे सर्कल, स्क्वेअर, चार पाच फुटांच्या रेडिमेड रांगोळ्यांचे डिझाइन्स, दरवाजात रांगोळ्यांसाठी आवश्यक असलेल्या पट्ट्या, वेगवेगळ्या डिझाइन्स बनवून दिल्या जातात. यावेळी डिझाइन्स तयार करताना मोल्डिंग, सॉर्टिंग, फिनिशिंग, पॅकिंगपासून सारे करण्यासाठी पुरेसा स्टाफही आहे. २०१८ पासून स्वाती हिने हे डिझाइन्स बनवून ऑर्डरप्रमाणे द्यायला सुरुवात केली. या डिझाइन्सना मुंबई, डोंबिवली, पुणे, नाशिक, धुळेपासून बाहेरगावी देखील अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्वाती सांगते. अमेरिकेतही या डिझाइन्स पाठविल्या आहेत. कारण हा एक क्रिएशन्सचाच भाग आहे असे नाही, तर यातून आपली भारतीय संस्कृती जपण्याचा एक मोठा प्रयत्न असल्याचे स्वाती सांगते.
या रांगोळीच्या डिझाइन्स साकारण्याची कल्पना स्वाती हिची स्वत:ची असून कलेचा आविष्कार म्हणजे स्वत: स्वाती आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण कलेच्या निर्मितीचे रांगोळी डिझाइन्स ही स्वातीची काही पहिलीच निर्मिती नाही. तर विजयदुर्ग हा शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या किल्याची प्रतिकृती स्वाती हिने स्वत: निर्मिली होती. २००५ साली विजयदुर्ग किल्ल्याच्या अष्टशताब्दी महोत्सवात स्वाती हिने साकारलेली प्रतिकृती खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनाही इतकी आवडली की, त्यांनी स्वातीचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. पण हेही नसे थोडकेप्रमाणेच शिर्डीच्या गाभाऱ्याची प्रतिकृती. तुळजापूरच्या भवानी आईच्या गाभाऱ्याची प्रतिकृतीही ऑर्डरप्रमाणे स्वाती हिने आजवर बनवून दिली आहे. कलेच्या प्रांगणात रमताना हाती कुंचला घेऊन तिने साकारलेली चित्रे देखील अवर्णनीय म्हणावी लागतील. करिअर नोकरीतच नाही, तर आपली कला आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, हेच स्वातीच्या अनेक कलाविष्कारातून प्रत्ययास येते.
कलेचा वारसा स्वातीला आजोबा, वडिलांपासून मिळाला आहे. कलेच्या प्रांतात एक महिला आज बिनधास्तपणे कुशाग्र बुद्धीने, अभ्यासपूर्ण इतके काही साकारते तेही अचूक याला दाद द्यावी तितकी थोडी आहे. कारण हातात जादू असली आणि त्याला बुद्धीची जोड असली आणि घरातील माणसांचा पाठिंबा असला तर ती स्त्री समाजात आपलं अस्तित्व निर्माण करू शकते, हे स्वातीकडे पाहून निश्चितच लक्षात येते.
रांगोळी डिझाइन्स ही स्वातीची पहिलीच निर्मिती नाही, तर विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती, शिर्डीच्या साईबाबांच्या गाभाऱ्याची प्रतिकृती, तुळजापूरच्या भवानी आईच्या गाभाऱ्याची प्रतिकृती तसेच तिने साकारलेली अनेक चित्रे कलेचा आविष्कारच म्हणावा लागेल.