नवी मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल २०२२ हंगामातील रविवारच्या (१७ एप्रिल) पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जसमोर फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबादला रोखण्याचे आव्हान आहे.
सनरायझर्सनी पाच सामन्यांत ३ विजयांसह ६ गुण मिळवले आहेत. सलग दोन पराभवांनंतर खेळ उंचावताना त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली. गतविजेता चेन्नई सुपरकिंग्जनंतर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सना त्यांनी हरवले. यंदाच्या हंगामात सलग तीन विजय मिळवणारा तो चौथा संघ आहे. आता केन विल्यमसन आणि सहकाऱ्यांना विजयाचा चौकार ठोकण्याची संधी आहे. मात्र त्यांना प्रतिस्पर्ध्याला कमी लेखून चालणार नाही.
पंजाबची अवस्था हैदराबादसारखीच आहे. त्यांनीही पाच सामने खेळताना तीन विजय मिळवले; परंतु कामगिरीत सातत्य नाही. बंगळूरुला हरवून विजयी सुरुवात केली तरी कोलकाताविरुद्ध मात खावी लागली. चेन्नईला हरवत पुन्हा विजय मिळवला तरी गुजरातविरुद्ध कच खाल्ली. मात्र पाचव्या सामन्यात मुंबईचा पराभव करताना पुन्हा विजयी मार्गावर आले.
आयडन मर्करमसह राहुल त्रिपाठी तसेच अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी हैदराबादच्या फलंदाजीची धुरा वाहिली आहे. बॉलिंगमध्ये मध्यमगती गोलंदाज टी. नटराजने ११ विकेट घेत कमालीचे सातत्य राखले आहे. मात्र निकोलस पुरनला फलंदाजीत तसेच फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जेन्सन आणि उमरान मलिकला गोलंदाजीत अधिक योगदान द्यावे लागेल.
पंजाबसाठी लियान लिव्हिंगस्टोनसह शिखर धवन, मयांक अग्रवाल तसेच राहुल चहरने बऱ्यापैकी योगदान दिले तरी त्यांच्या सर्वच प्रमुख क्रिकेटपटूंना खेळ उंचावण्याची आवश्यकता आहे.
वेळ : दु. ३.३० वा. ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम